Pune Crime News | डॉ. आंबेडकर जंयतीसाठी 50 हजार रुपयांची वर्गणी देण्यास मालकाला सांगण्यासाठी टोळक्याने इंजिनिअरला नेले उचलून, येवलेवाडी पोलिसांनी दाखल केला खंडणीचा गुन्हा
पुणे : Pune Crime News | बांधकाम साईटवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीसाठी मालकाला ५० हजार रुपये वर्गणी देण्यास सांग, असे म्हणून इंजिनिअरला उचलून नेऊन बांधकाम साईटवर २ तास थांबून ठेवणार्या ६ जणांवर येवलेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
आकाश गजानन चौधरी (वय २७, रा. साईप्रसाद सोसायटी, चैतन्यनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनोद चंदर चव्हाण (रा. गो शाळेजवळ, टिळेकरनगर), विजय शिवाजी दुनधव, नवीन सिद्धाम मोटे (रा. टिळेकर नगर), आयेश विजय मकमले (रा. उंड्रीवूड सोसायटी, येवलेवाडी), राहुल नागप्पा उन्नत (रा. म्हसोबा मंदिराजवळ, टिळेकर नगर), समर्थ बाबूराव पांडागळे (रा. टिळेकर नगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर येथील प्रचित इंटरनिया या बांधकाम साईटवर ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या अशोक जैन अँड असोशिएट या फर्ममार्फत कोंढव्यातील टिळेकरनगर येथे प्रचित इटर्निया हा प्रकल्प सुरु आहे. आकाश चौधरी हे बांधकाम साईटवर इंजिनिअर आहेत. ३ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता आरोपी या साईटवर आले. त्यांनी आकाश चौधरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या वर्गणीसाठी मालक अशोक जैन यांना फोन करुन ५० हजार रुपये वर्गणी देण्यास सांग, असे सांगितले.
मालक साईटवर हजर नसल्याने आरोपींनी त्यांच्या ऑफिसच्या पत्याबाबत विचारणा केली. त्यांनी पत्ता सांगितला. तेव्हा त्यांनी तू आम्हाला त्यांच्या ऑफिसवर घेऊन चल, असे म्हणाले. त्याला चौधरी यांनी विरोध करुन त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. तेव्हा विनोद चव्हाण व विजय दुनघव यांनी त्यांच्या दुचाकीवर पाय जबरदस्तीने टाकून त्यांना उचलून गाडीवर बसविले. त्यांना ४०० ते ५०० मीटर अंतरावर घेऊन गेले. त्यानंतर त्यांना पुन्हा साईटवर घेऊन आले. तेथे साईटवर २ तास थांबुन ठेवले. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करीत आहेत.
