Pune Crime News | हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन दुचाकी चोरुन नेणार्‍या दोघा चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी पकडले; दुचाकी चोरुन घेऊन जाताना केला अपघात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | हत्याराचा धाक दाखवून चोरट्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका मोटारसायकलची तोडफोड करुन नुकसान केले तर दुसरी  दुचाकी चोरुन नेली. चोरलेली  दुचाकी घेऊन जात असताना पिंपरीमध्ये  तिला अपघात केला.चंदननगर पोलिसांनी यातील दोघांना अटक केली आहे.

आकाश हरीश्चंद्र पायगुडे Akash Harishchandra Paygude (वय २४, रा. कलवड वस्ती, विश्रांतवाडी) आणि आतिष उमेश डिंगरे Atish Umesh Dingre (वय २५, रा. धानोरी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत कल्याण विठ्ठल भापकर (वय २१, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी गावठाण येथील लोणकर शाळेच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालय व वडगाव शेरी भाजीमार्केट येथे ३ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याण भापकर हे कुल्फी विकण्याचा व्यवसाय करतात. ते व त्यांचा  मित्र जितू चावरिया हे लघु शंकेसाठी शौचालयात गेले होते. त्यावेळी तिघा आरोपींनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेली. तसेच फिर्यादी यांच्या  तोंड ओळखीचा प्रसाद ससाणे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या मोटारसायकलची तोडफोड करुन ३ हजार रुपयांचे नुकसान केले. प्रसाद याच्या घराच्या दरवाजावर लोखंडी हत्याराने मारुन नुकसान केले व फिर्यादी यांची दुचाकी चोरुन नेली. चंदननगर पोलिसांनी  जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

चंदननगर पोलीस आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणात ते पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आकाश पायगुडे व आतिष डिंगरे यांना पकडले. तेव्हा त्यांनी चोरलेली गाडी घेऊन जात असताना पिंपरी येथे त्यांचा अपघात होऊन ते किरकोळ जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.

You may have missed