Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल जाब विचारणार्या वडिल, आईला नराधमांनी केली मारहाण, मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना केली अटक
पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल तिच्या वडिलांनी जाब विचारला असताना त्यांना व त्यांच्या पत्नीला लोखंडी हत्यार, सिमेंट ब्लॉक व दगडाने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या एका ३८ वर्षाच्या वडिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज खान (वय ५०), इरफान शेख (वय २३), इम्रान खान (वय २१) आणि अरमान खान (वय १८, सर्व रा. आदीशक्ती मित्र मंडळ चौक, प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना प्रेमनगर वसाहतीत ५ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी जात असताना आरोपी यांनी तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हे समजल्यावर फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारण्यासाठी आवाज दिला. तेव्हा आरोपींनी वादावादी करुन लोखंडी हत्यार, सिमेंट ब्लॉक व दगडाने मारहाण करुन जबर जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी पत्नी आली असता तिलाही झटापटीदरम्यान मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी कट्टे तपास करीत आहेत.
