Pune Crime News | आता फोनवर डॉक्टरांची अपॉईमेंट घेणे नाही राहिले सुरक्षित; डॉक्टरांच्या अपॉईमेंटसाठी ५ रुपये गुगलपे केले आणि ज्येष्ठ नागरिकाला बसला साडेपाच लाखांचा फटका

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  सायनसचा त्रास होत असल्याने ऑनलाईन मिळालेल्या कान नाकघसा तज्ञ डॉक्टरांना अपॉईमेंटसाठी ज्येष्ठ नागरिकाने फोन केला. अपॉईमेंटसाठी ५ रुपये पाठविल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ५४ हजार ६१० रुपये ट्रान्सफर करुन घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत लॉ कॉलेज रोडवर राहणार्‍या एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सायनसचा त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी माबाईलवर ऑनलाईन तपासणी केली. कान नाक घसा तज्ञ डॉ. घैसास यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर अपॉईमेंटसाठी कॉल करा असे लिहिलेले होते. त्यांनी त्या नंबरवर कॉल केल्यावर पलिकडून हॉस्टिपलमधून बोलत असल्याचे सांगितले. अपॉईमेंट फिक्स करण्यासाठी त्यांना ५ रुपये गुगलपे करण्यास सांगून त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. त्याद्वारे पेशंटची माहिती देण्यास सांगितले. त्यांनी ५ रुपये पाठविल्यावर त्यांना संशय आल्याने त्यानी लगेच मोबाईल कॉल बंद केला. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस स्वत: कडे घेतला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलला लिंक असलेल्या त्यांच्या बँक खात्यातून १८मार्च २०२६ रोजी तीन ते चार व्यवहार केले. त्यानंतर २८ व २९ मार्च रोजी काही व्यवहार करुन ५ लाख ५४ हजार ६१० रुपये ट्रान्सफर करुन घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आत ती तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर तपास करीत आहेत.

You may have missed