Pune Crime News | जादा दर मागितल्याने रॅपिडो कॅबचालकाला लाथाबुक्क्यांनी, दगडांनी मारहाण करुन केले गंभीर जखमी 3 महिलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रॅपिडो कंपनीने दिलेला दर परवडत नाही, २५ रुपये किमीने नेतो, असे सांगितल्याने झालेल्या वादात ६ जणांनी रॅपिडो कॅबचालकाला लाथाबुक्क्यांनी, दगडांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी ३ महिलांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत श्रीकृष्ण मधुकर लाड (वय ३०, रा. यशराज कॉम्प्लेक्स, लोणी काळभोर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कदमवाक वस्ती येथील जगदंब हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली. त्यावरुन पोलिसांनी धवल रावले, सरस्वती रावले, वैष्णवी, यशवंत चळवादी, सुषमा चळवादी, मनिषा चळवादी (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोणी काळभोरमधील साई सृष्टी अपार्टमेंटसमोर ५ एप्रिल रोजी रात्री पावणेदहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्ण लाड हे रॅपिडो कॅबचालक आहे. भाड्याने टॅक्सी सर्व्हिस देणार्या कंपन्यांनी ठरविलेल्या दर खूप कमी असल्यावरुन सध्या वाद सुरु आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने कंपनीच्या दरात कॅब चालविणे परवडत नाही, यावरुन प्रवासी व कॅबचालक यांच्यात वाद होत आहेत. त्यातूनच कॅबचालकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
कॅबचालक लाड यांना पिकअप बुकींग आल्याने ते साईसृष्टी अपार्टमेंट येथे आले. थोड्या वेळाने धवल रावले व ४ महिला आल्या. धवल को चालकाच्या सीटवर बसले. मागील बाजूला ४ महिला बसल्या. लाड याने मागे चार जणांना परवानगी नाही, असे सांगितले. तेव्हा महिलांनी काहीही होत नाही, चालव तू गाडी असे सांगितल्यावर त्यांनी सांगितले, मी चालवतो पण २५ रुपये किमीप्रमाणे जाऊ. आमच्या संघटनेने हा दर सर्वांना लागू केला आहे. त्यावेळी मागे बसलेल्या महिलांनी अरेरावी करुन रॅपिडोच्या दराप्रमाणे चालण्यासाठी वाद घालू लागल्या. सीएनजीचे दर वाढले आहेत.
या रेटमध्ये आम्हाला परवडत नाही आणि संघटनेने आम्हाला २५ रुपये दर बंधनकारक केला आहे, असे सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करत बुकींग कॅन्सल केले. ते गाडी सोसायटीच्या बाहेर घेऊन पुढील बुकिंगची वाट पाहत थांबले होते. थोड्या वेळाने या महिलांसह एक जण आला. त्यांना म्हणाला की, तू अजुन इथेच उभा आहेस का, तुला लय मस्ती आली आहे का, असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यावर लाड म्हणाले की, मी रोडवर उभा आहे, नविन बुकिंगची वाट पहात आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मी पण लोणी काळभोरमध्ये राहणारा आहे, असे म्हणाल्यावर त्याने लाड यांना कारमधून बाहेर ओढले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने तेथे पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. त्यांच्या कानावर, पोटात, पाठीत, पायावर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे तपास करीत आहेत.
