Pune Crime News | दारु पिऊन वाहन चालविणार्‍याला न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Pune Crime Court News

पुणे : Pune Crime News |  दारु पिऊन वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता निर्माण होऊन स्वत: बराबरच दुसर्‍याच्या जीवाला धोका निर्माण होतो, असे सांगूनही अनेक जण बिनधास्त मद्यप्राशन करुन वाहन चालवितात. अशाच एका मद्यप्रेमी वाहनचालकाला शिवाजीनगर न्यायालयाने १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना आळंदी येथील मरकळ रोडवरील ज्ञानेश्वर मिसळ येथे ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. महिला पोलीस अंमलदार मिलखे यांना ३१ वर्षांचा तरुण दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे मिळून आला होता. त्याच्यावर दिघी – आळंदी वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम १८५, १८४ प्रमाणे कारवाई करुन शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात खटला पाठविण्यात आला होता.

मोटार वाहन न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. आरोपी वाहनचालकाचा मोटार वाहन कायदा कलम २०३ (६) अन्वये त्याचा वैद्यकीय चाचणी नमुना पुरावा म्हणून ग्राह्य धरुन त्याला दोषी धरण्यात आले. त्याला मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही कारावासाच्या शिक्षा एकत्रित भोगावयाची आहे.

नागरिकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

You may have missed