Bapu Pathare MLA | येरवडा मनोरुग्ण रुग्णालयातील कारभाराबाबत सखोल चौकशीची आमदार बापूसाहेब पठारे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: Bapu Pathare MLA | येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्ण रुग्णालयातील अनियमितता व रुग्णांना भेडसावणाऱ्या गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित विषयावर सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी आमदार पठारे यांनी रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता, रुग्णांच्या देखभालीतील त्रुटी तसेच प्रशासकीय अनियमितता या गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या. या परिस्थितीमुळे रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून ही बाब मानवतावादी दृष्टीकोनातून अत्यंत चिंताजनक असल्याचे आमदार पठारे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच रुग्णांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनास योग्य ते निर्देश देण्याची गरज व्यक्त केली.
रुग्णालयातील एकूण कार्यप्रणाली सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीचा पाहणी दौरा आयोजित करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घ्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. रुग्णांच्या हितासाठी व आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी हा पाठपुरावा पुढेही सातत्याने सुरू राहील, अशी भूमिका आमदार पठारे यांनी व्यक्त केली.
कोट
“रुग्णांच्या असहाय्यतेचा आणि भावनांचा कोणीही गैरफायदा घेत असेल, तर त्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. अशा संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. तसेच, या रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा राहील.”
