Ritu Tawde | वरळीत भाजपच्या मोर्चात महिलेचा राडा; वाहतूक कोंडीमुळे मंत्र्यांना झापले, महापौर रितू तावडेंकडून दिलगिरी
मुंबई : Ritu Tawde | मुंबईतील वरळी परिसरात नारीशक्ती वंदन विधेयकावरून ‘इंडिया’ आघाडीचा निषेध करण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ला एका अनपेक्षित घटनेमुळे वेगळे वळण मिळाले. या भव्य मोर्चामुळे वरळी नाका आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, ज्याचा फटका बसल्याने एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मोर्चात शिरून भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले.
या महिलेने भररस्त्यात मंत्र्यांच्या ताफ्यासमोर आपला संताप व्यक्त करत, आंदोलनांच्या नावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरण्यावरून प्रशासनाला जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या माजी महापौर रितू तावडे यांनी अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मी स्पष्ट सांगते की नारीशक्ती वंदन अधिनियम सुधारणा विधेयकाच्या विरोधाच्या माध्यमातून महिलांच्या राजकीय हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात हा आमचा ठाम आणि योग्य लढा आहे. हा मोर्चा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध पुकारलेला एल्गार होता आणि त्यासाठी रीतसर पोलीस परवानगीही घेण्यात आली होती. मात्र, मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
“लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी नागरिकांची गैरसोय होणे दुर्दैवी आहे, त्याबद्दल मी माफी मागते,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही, या घटनेमुळे राजकीय आंदोलनांमुळे विस्कळीत होणाऱ्या मुंबईच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
