Maharashtra Weather Alert | राज्यात हवामानाची मोठी उलथापालथ! 11 मे रोजी कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तडाखा? वाचा सविस्तर
पुणे : Maharashtra Weather Alert | भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज ११ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राज्यात एकाच वेळी पावसाचे सावट आणि कडक उन्हाचा चटका असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे.
सध्या मराठवाड्यापासून ते थेट पाकिस्तान आणि पंजाबपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज पुण्यात कमाल तापमान ४०-४२ अंशांपर्यंत राहील. तसेच आज अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. केवळ पुणेच नव्हे, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील आणि वादळी पावसाची हजेरी लागेल. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, ज्यामुळे बागायतदारांची धाकधूक वाढली आहे.
दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची शक्यता धुसर असली तरी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होईल, असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र स्थिती वेगळी असून तिथे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या हालचालींमुळे दक्षिणेकडून येणारे वारे बाष्प घेऊन येत आहेत, ज्याचा परिणाम म्हणून पुढील ४-५ दिवस राज्यातील वातावरण असेच लहरी राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये आणि शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
