PM Narendra Modi | इंधन बचत करा, ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरू करा आणि सोन्याची खरेदी टाळा; पंतप्रधानांचे देशाला मोठे आवाहन

PM Narendra Modi | Save fuel, resume 'work from home' and avoid buying gold; PM's big appeal to the country

 
हैदराबाद :  
PM Narendra Modi | पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या जागतिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबाद येथील एका जाहीर सभेत देशवासियांना ‘कठोर राष्ट्रभक्ती’चे आवाहन केले आहे. “भारताकडे स्वतःच्या मोठ्या तेल विहिरी नाहीत, त्यामुळे आपण आयातीवर अवलंबून आहोत. अशा वेळी इंधनाची बचत करणे, हे केवळ पैशांची बचत नसून ती देशसेवा आहे,” अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना साद घातली.

पंतप्रधान म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. भारताला आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक तेल परदेशातून विकत घ्यावे लागते. यावर खर्च होणारे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संयम पाळणे ही काळाची गरज बनली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

– ‘वर्क फ्रॉम होम’ची गरज : कोरोना काळात आपण घरातून काम करण्याची आणि ऑनलाईन बैठकींची जी पद्धत स्वीकारली होती, ती आता पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होऊन इंधनाची मोठी बचत होईल.
– सार्वजनिक वाहतुकीचा वापर : ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तिथल्या नागरिकांनी स्वतःच्या खासगी गाड्यांऐवजी मेट्रोला प्राधान्य द्यावे. तसेच लांबच्या प्रवासासाठी कारपूलिंगचा (एकाच गाडीतून अनेक जणांनी प्रवास करणे) अवलंब करावा.
– सोनं खरेदीवर मर्यादा : भारताला मोठ्या प्रमाणावर सोने आयात करावे लागते, ज्यामुळे देशाचे परकीय चलन बाहेर जाते. “एकेकाळी लोकांनी देशासाठी सोने दान केले होते, आज मी दान मागत नाही, पण किमान वर्षभर तरी सोन्याची खरेदी टाळा,” असे भावनिक आवाहन मोदींनी केले.
– परदेशी सहली आणि लग्ने टाळा : ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी परदेशात जाण्याची सध्याची फॅशन देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणत आहे. त्याऐवजी स्वदेशी पर्यटनाला चालना द्या आणि देशातच लग्नकार्ये साजरी करा, असे त्यांनी सुचवले.
– दैनंदिन जीवनात बदल : घराघरातील आयात केलेल्या वस्तूंचा वापर कमी करून ‘लोकल’ उत्पादनांना प्राधान्य द्या. अगदी खाद्यतेलाचा वापरही १० टक्क्यांनी कमी केल्यास त्याचा फायदा देशहितासाठी आणि वैयक्तिक आरोग्यासाठी होईल, असेही ते म्हणाले.

You may have missed