CM Devendra Fadnavis | ‘पंतप्रधानांचे आवाहन गांभीर्याने घ्या, अन्यथा इंधन टंचाईचा मोठा फटका बसेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

CM Devendra Fadnavis

नागपूर :   CM Devendra Fadnavis | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि सोने खरेदी टाळण्याबाबत देशवासियांना केलेल्या आवाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. “जगातील परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. जर आपण आताच सावध झालो नाही आणि इंधनाचा वापर मर्यादित केला नाही, तर भविष्यात भारतालाही गंभीर इंधन टंचाईचा सामना करावा लागू शकतो,” असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धासोबतच आता पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. जगातील अनेक प्रगत देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले असून तिथे ऊर्जेचे संकट निर्माण झाले आहे. आपल्या शेजारील पाकिस्तानात पेट्रोलचे दर ४५० रुपयांच्या पार गेले आहेत, याकडे लक्ष वेधत त्यांनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.

“पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे आणि मुत्सद्दी धोरणांमुळे आजही भारतात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हाहाकार माजलेला असतानाही भारतीयांना अद्याप कोणतीही टंचाई जाणवलेली नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की आपण संसाधनांची उधळपट्टी करावी. जर आपण वेळेत स्वतःला शिस्त लावली नाही, तर आपल्यावरही कठीण प्रसंग ओढवू शकतो,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलची बचत करणे हे केवळ वैयक्तिक फायद्याचे नसून ते एक मोठे राष्ट्रीय कर्तव्य आहे. “आपण आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक तेल परदेशातून आयात करतो. जर प्रत्येक नागरिकाने इंधनाचा वापर १० टक्क्यांनी जरी कमी केला, तर देशाचे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचेल. हेच पैसे नंतर लोककल्याणासाठी आणि विकासासाठी वापरता येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी सुचवलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे उपाय पर्यावरणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी पूरक आहेत. तसेच, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील खर्च कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळणे आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे हाच ‘आत्मनिर्भर भारता’चा खरा मार्ग आहे. “पंतप्रधानांनी देशहितासाठी दिलेली ही ‘नऊ सूत्रे’ महाराष्ट्रातील जनतेने जाणीवपूर्वक पाळावीत,” असे आवाहन फडणवीस यांनी केले.

You may have missed