Mumbai High Court | ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी न केल्याचा आरोप; पुणे पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका

Mumbai High Court | Allegation of not enforcing noise pollution rules; Contempt petition filed in High Court against Pune Police Commissioner

पुणे : Mumbai High Court | शहरातील ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्याचा आरोप करत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. सत्या मुळे यांनी दिली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, श्री स्वामी समर्थ सहकारी संस्था तसेच 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2024 रोजी ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, पुणे पोलिसांकडून त्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

गणेशोत्सवातील DJ, ॲम्प्लिफायर आणि लेझरचा मुद्दा

गणेशोत्सव, धार्मिक सण, राजकीय कार्यक्रम, मिरवणुका आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उच्च क्षमतेच्या DJ सिस्टीम, ॲम्प्लिफायर आणि लेझर बीमच्या वापराचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

अतितीव्र आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी, दुकानदार आणि कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ही याचिका कोणत्याही धर्माच्या किंवा उत्सवाच्या विरोधात नसून सर्व प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाविरोधात असल्याचे ॲड. सत्या मुळे यांनी स्पष्ट केले. कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेत पारंपरिक वाद्ये आणि संगीताच्या वापरास विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बालेवाडी, बाणेर आणि विमाननगरसारख्या निवासी भागांतील बार, पब, क्लब, रूफटॉप बार आणि रेस्टॉरंटमधून होणाऱ्या कथित ध्वनिप्रदूषणाचाही मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

ध्वनिमर्यादांकडे वेधले लक्ष

ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 नुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 आणि रात्री 70 डेसिबल, व्यापारी क्षेत्रात 65 आणि 55, निवासी क्षेत्रात 55 आणि 45, तर शांतता क्षेत्रात 50 आणि 40 डेसिबलची मर्यादा असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकाकर्त्यांनी 2025 मधील काही ध्वनिपातळीच्या नोंदींचाही उल्लेख केला आहे. त्यानुसार जेधे चौकात 105 डेसिबल, टिळक चौकात 93.8, संत कबीर चौकात 90.2 आणि सोन्या मारुती चौकात 90.2 डेसिबल आवाज नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई’ – पोलीस आयुक्त

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. साउंड सिस्टीम जप्त करण्यात आल्या असून एक हजारांहून अधिक ध्वनिपातळीच्या रीडिंग घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 148 प्रकरणांत नियमांनुसार कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

You may have missed