Pune Crime News | महापालिकेच्या व्यायामशाळेतून साहित्य चोरी; विश्रांतवाडीत गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पुणे महापालिकेच्या विश्रांतवाडी परिसरातील व्यायामशाळेतून चोरट्यांनी सुमारे साडेआठ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिकेच्या क्रीडा विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरात पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाची व्यायामशाळा असून याच परिसरात नानासाहेब परुळेकर जलतरण तलावही आहे.
चोरट्यांनी व्यायामशाळेच्या तुटलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि आतील सुमारे साडेआठ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.
