Pune Crime News | कात्रजमधील मांगडेवाडीत घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास
पुणे : Pune Crime News | कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथे बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका तरुणाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या कुटुंबीयांसह मांगडेवाडी येथील स्वप्नशिल्प सोसायटीत राहतो. 21 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे कुटुंबीय सदनिका बंद करून बाहेर गेले होते.
याच कालावधीत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दुपारी सुमारे दोनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.
