Pune Crime News | पुणे : रिक्षा चालकास दगडाने मारहाण; दात तोडून जखमी केल्याने युवकावर गुन्हा दाखल, डेक्कन परिसरातील घटना
पुणे : Pune Crime News | महिला प्रवासी बसलेल्या असताना जबरदस्तीने रिक्षा अडवून गुंडगिरी करणारा तरुण रिक्षात बसला. त्याला उतरण्यास सांगितल्यावर त्याने रिक्षाचालकाला दगड मारुन जखमी केले. रिक्षाच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिल लक्ष्मण डिकुळे (वय ३८, रा. रामनगर पोलीस चौकी शेजारी, वारजे) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बीएमसीसी रोडवरील गणेशवाडी येथील त्रिवेणी हॉटेलसमोर २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल डिकुळे हे महिला प्रवाशांना घेऊन जात होते. त्यावेळी एक जण काही एक न विचारता रिक्षामध्ये येऊन महिला प्रवाशाजवळ बसला. डिकुळे यांनी त्याला “माझे रिक्षामध्ये अगोदरच पॅसेंजर आहे़ रिक्षामधून खाली उतर” असे त्याला सांगितले. तरी तो रिक्षामध्ये बसुन राहिला. तेव्हा त्यांनी हाताला धरून रिक्षातून बाहेर काढले. या गोष्टीचा त्याला राग आला. त्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण केली. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या लाकडाने व पेव्हर ब्लॉकच्या सिमेंटच्या विटेने त्यांच्या चेहर्यावर, पाठीवर मारहाण केली. या मारहाणीमध्ये रिक्षाचालक यांच्या जबड्याच्या वरील पुढील बाजूचा एक दात अर्धवट तुटला. रिक्षाची समोरील काच फोडून नुकसान केले. रिक्षाचालकाला पुन्हा येथे दिसला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. काही वेळातच तो व्हायरल झाला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करीत आहेत.
