Zika Virus In Pune |  पुण्याला ‘झिका’चा धोका कायम; 26.5 टक्के डासांच्या समूहांत विषाणू, जनुकीय बदलही आढळले

Zika Virus in Pune | Risk of Zika persists in Pune; virus detected in 26.5% of mosquito pools, genetic mutations also found.

पुणे: Zika Virus In Pune |  ICMR-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), पुणे येथील शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुणे महापालिका क्षेत्रात झिका विषाणूचा धोका अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे. 2024 मधील झिका उद्रेकानंतर करण्यात आलेल्या डासांच्या सर्वेक्षणात 128 डास समूहांपैकी 34 म्हणजेच 26.5 टक्के समूहांमध्ये झिका विषाणूचे RNA आढळले.

संशोधकांनी बाधित भाग आणि त्यांच्या परिसरातून 577 प्रौढ डास आणि 3,190 अळ्या गोळा केल्या होत्या. पॉझिटिव्ह आढळलेल्या 34 समूहांमध्ये 29 Aedes aegypti प्रौढ डासांचे, चार अळ्यांचे आणि एक Aedes albopictus डासांचा समूह होता. वारजे, धनकवडी, नगर रस्ता-येरवडा, टिळक रस्ता, बिबवेवाडी, घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता आणि कोंढवा-येवलेवाडी या भागांत पॉझिटिव्ह नमुने आढळले.

2024 मध्ये पुणे शहरात झिकाचे 108 रुग्ण आढळले होते. त्यामध्ये 45 गर्भवती महिलांचा समावेश होता. सर्वेक्षण केलेल्या 298 घरांपैकी 90 घरांमध्ये डासांची पैदास आढळली आणि हाऊस इंडेक्स 30.2 टक्के नोंदवण्यात आला.

दोन विषाणू नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण केल्यानंतर ते दोन्ही आशियाई वंशावळीतील असल्याचे स्पष्ट झाले. उत्क्रांती विश्लेषणानुसार त्यांचा अलीकडील समान पूर्वज सुमारे 2014 च्या काळातील असल्याचे दिसून आले. एका नमुन्यात जलद विषाणू प्रतिकृतीकरण आणि डासांमधील अधिक संसर्गक्षमतेशी संबंधित म्युटेशनही नोंदवण्यात आले. त्यामुळे डास आणि मानवांमधील झिका विषाणूच्या जनुकीय रचनेवर सातत्याने देखरेख ठेवण्याची गरज संशोधकांनी अधोरेखित केली आहे.

You may have missed