Pune Crime News | पुणे : JCB, क्रेनच्या सहाय्याने अतिक्रमण करुन जमिनीचा बेकायदा ताबा मिळविल्याच्या आरोपावरुन खर्डे पाटील फर्मच्या दोघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: A case has been registered against two individuals from the Kharde Patil firm for allegedly illegally taking possession of land by carrying out encroachments with the help of a JCB and a crane.

पुणे : Pune Crime News | बँकेच्या लिलावात १०५ कोटी रुपये भरुन ताबा मिळविलेल्या जमिनीवरील बोर्ड जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने तोडून बेकायदा ताबा मिळविल्याच्या आरोपावरुन बावधन पोलिसांनी खर्डे पाटील फर्मच्या दोघांसह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अभि विजय रौंदळ (वय ३३, रा. मॅनहॅटन, पल्लोड फार्म, बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अरुण वेणुनाथ खर्डे पाटील (Arun Venunath Kharde Patil) आणि प्रसाद अरुण खर्डे पाटील (Prasad Arun Kharde Patil) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना म्हाळुंगे गावात २७ सप्टेबर रोजी सकाळी ६ ते १२ वाजेच्या दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभि व त्यांचे वडील विजय रौंदळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी म्हाळुंगे हद्दीमधील सर्वे ९/१० व इतर मधील १२६ आर क्षेत्राची युनियन बँक ऑफ इंडियाने काढलेल्या लिलावात १०५ कोटी ५ लाख रुपयांना विकत घेतली आहे. बँकेने जागेचा ताबा त्यांना दिला आहे. जागेवर ७ मजली इमारत होती, ती इमारत त्यांनी पाडली असून तेथे त्यांना व्यावसायिक इमारत बांधायची आहे. त्यांच्या जागेतून मेट्रो लाईन ३ ही गेली असल्याने अडीच गुंठ्ठ्यांचा सरकारी मोबदलाही त्यांच्या फर्मला मिळालेला आहे.

२७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खर्डे पाटील फर्मतर्फे अरुण वेणूनाथ खर्डे पाटील व प्रसाद अरुण खर्डे पाटील यांनी ४० ते ५० जणांसह बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या जागेत जबरदस्तीने प्रवेश केला. कंपनीच्या जागेत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे व संपूर्ण निगराणी व्यवस्था जाणीवपूर्व नष्ट करण्यात आली. जेणे करुन त्यांच्या कृत्यांचे इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट होतील व आरोपींची ओळख पटू नये, असा आरोप केला आहे.

त्यानंतर प्रसाद खर्डे पाटील यांनी स्वत: मालमत्तेची संपूर्ण पाहणी करुन विविध भाग त्यांच्या सोबत आलेल्या ४० ते ५० जणांना दाखविले असल्याची माहिती फिर्यादी यांना सुरक्षा रक्षक नितीन वसंत सोनवणे, धनाजी मारुती गाडेकर व शुभम विजय सोनवणे यांच्याकडून समजली. त्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार संपूर्ण जमावाने क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने जमीन मिळकतीच्या पूर्वेकडील सिमेंट विटांचा व पत्र्याचे कंपाऊडची तोडफोड करुन त्यांच्या जमीन मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर प्रसाद खर्डे पाटील यांनी जमावाला आदेश देऊन जमीनीवर लोखंडी अँगलच्या सहाय्याने पत्रे मारुन अतिक्रमण करुन बेकायदेशीर कब्जा केला.

त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या फर्मचा पूर्वेकडील दगड विटाचे व पत्र्याचे कंपाऊंडवरील “तीर्थ” नावाचा बोर्ड काढून तो फोडून कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. याची माहिती सकाळी पावणेदहा वाजता त्यांच्या फर्मचे सर्वेश शहा यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. हे कृत्य करतेवेळी खर्डे पाटील फर्मतर्फे अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील हे पांढर्‍या रंगाच्या एसयुव्ही वाहनात बसून संपूर्ण बेकायदेशीर कारवायांचे निरीक्षण व नियंत्रण करीत होते, असा आरोप करण्यात आला आहे. साधारण साडेदहा वाजता पोलीस आले. पोलिसांनी त्यांना बेकायदेशीर कृत्य न करण्याबाबत समज दिली. साधारण १२ वाजण्याच्या सुमारास खर्डे पाटील तर्फे अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील हे निघून गेले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक बालाजीसिंग ठाकूर तपास करीत आहेत.

You may have missed