Pune Crime News | पुणे : अल्पवयीन विद्यार्थ्याला शिवीगाळ आणि मारहाण करणारा पोलिस अखेर ‘सापडला’; लोहगाव पोलिसांनी बजावली नोटीस

Pune Crime News | Pune: Policeman who verbally abused and assaulted a minor student finally traced; Lohgaon police serve notice.

पुणे: Pune Crime News | रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून 17 वर्षीय विद्यार्थ्याचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी पोलिसाचा लोहगाव पोलिसांनी अखेर शोध लावला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील अनेक ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. तपासानंतर विद्यार्थ्याला मारहाण करून घटनास्थळावरून निघून गेलेल्या आरोपी पोलिसाची ओळख पटवण्यात आली.

लोहगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसाचे नाव वसंत जगताप असून तो चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. लोहगाव पोलिसांनी त्याला नोटीस बजावली असून या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रारीनुसार, लोहगाव परिसरात राहणारा विद्यार्थी 26 जुलै रोजी रात्री सुमारे 9 वाजता मित्रांना भेटून मोझेनगर येथून डी. वाय. पाटील लोहगाव रस्त्याने मोपेडवरून घरी जात होता.

पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते आणि त्यामध्ये पाणी साचले होते. डी. वाय. पाटील चौकातील पुनेरी बिर्याणी हॉटेलसमोरून जात असताना खड्ड्यातील पाणी समोरून येणाऱ्या वसंत जगताप यांच्या अंगावर उडाल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने ‘सॉरी’ म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याचा राग आल्याने संबंधित पोलिसाने विद्यार्थ्याचा पाठलाग केला. राजरत्न हॉटेलसमोर त्याची दुचाकी आडवी लावून त्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपी पोलिस त्याच परिसरातील एका सोसायटीत राहतो. मारहाणीनंतर तो तेथून निघून गेला, मात्र काही वेळाने पुन्हा त्याच मार्गाने घरी गेल्याचे तपासात समोर आले.

महिनाभर चालला आरोपीचा शोध

घरी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्याने संपूर्ण घटना वडिलांना सांगितली. त्यानंतर रात्री उशिरा लोहगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीच्या मागील बाजूस पोलिसांचा लोगो असल्याची माहिती विद्यार्थ्याने तपास अधिकाऱ्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी CCTV फुटेज तपासून जवळपास महिनाभर तपास केला आणि अखेर आरोपी पोलिसाची ओळख पटवली.

You may have missed