Pune Crime News | किरकोळ वादातून शाळकरी मुलावर दोघा अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आंबेगावातील घटना
पुणे : Pune Crime News | पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन दोघा अल्पवयीन मुलांनी शाळेत जात असलेल्या आपल्या वर्गमित्रावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी १४ वर्षाच्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत वडगाव बुद्रुकमधील घुलेनगर येथे राहणार्या एका १५ वर्षाचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगावातील दभाडी येथील त्यांच्या शाळेजवळील आर जी सुपर मार्केटसमोर २९ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा व आरोपी अल्पवयीन मुले हे नववीमध्ये शिकतात. त्यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. फिर्यादी मुलगा शाळेत जात होता. यावेळी शाळेपासून काही मीटर अंतरावर त्याच्या वर्गमित्रांनी त्याला अडविले. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते दोघे पळून गेले होते. गंभीर जखमी झालेल्या या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.
पोलिसांनी पसार झालेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करत आहेत.
