Pune Crime News | पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची सोनसाखळी लंपास
पुणे : Pune Crime News | पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने लंपास केल्याची घटना विमाननगर परिसरात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीतील उबाळेनगर परिसरात राहतात.
मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे पाच वाजता ते विमाननगर ते वाघोली या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. काही वेळानंतर सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंड करीत आहेत.
