Pune Traffic Updates | पुणे : वाहतुकीचा वेग 123 टक्क्यांनी मंदावला; MPSC विद्यार्थी आंदोलनांमुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांचा श्वास कोंडला
पुणे : Pune Traffic Updates | नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलासह शहरातील तीन ठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांचा पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मंगळवारी मोठा परिणाम झाला आहे. आंदोलनस्थळी होणारी गर्दी आणि काही रस्त्यांवरील वाहतुकीतील अडथळ्यांमुळे अनेक मार्गांवर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या निरीक्षणातून समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी 3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीतील वाहतूक परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानुसार एस. एम. जोशी पुलाच्या जोडरस्त्यावर सामान्यतः ताशी 11.4 किलोमीटर असणारा वाहनांचा सरासरी वेग आंदोलनाच्या काळात ताशी केवळ 5.3 किलोमीटरपर्यंत खाली आला.
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC संदर्भातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, पुण्यासह राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय नवी पेठेतील अहिल्यादेवी अभ्यासिका आणि टिळक चौक परिसरातही विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत.
आंदोलन, रस्ता बंद किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी घटना घडल्यानंतर वाहतूक विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परिस्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन, पर्यायी मार्ग आणि नागरिकांसाठी सूचना जारी केल्या जातात.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनांमुळे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि वाहतूक सुरळीत ठेवता यावी, यासाठी या अहवालाचा उपयोग पुढील नियोजनासाठी केला जाणार आहे.
पोलिसांच्या निरीक्षणानुसार, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एस. एम. जोशी पुलाच्या जोडरस्त्यावर सर्वाधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत कोंडीची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले.
शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून खंडोजी बाबा चौक ते रूपाली हॉटेल या पट्ट्यातही वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तेथील कोंडी पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वेळ लागला. नवी पेठेतील सुमारे 80 टक्के रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडल्याचेही निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.
3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात पाऊस झालेला नसल्याने या कोंडीचा हवामानाशी संबंध नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनातील गर्दी आणि रस्त्यांवरील अडथळे हीच वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
