Pune Crime News | ‘ATS अधिकारी’ असल्याची बतावणी करून अटकेची भीती; 75 वर्षीय ज्येष्ठाची आठ लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | बँक खात्याचा वापर कथित काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांकडून अटक होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी हडपसरमधील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हडपसर परिसरात राहतात. 7 सप्टेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून स्वतःची ओळख दहशतवाद विरोधी पथकातील (ATS) अधिकारी अशी करून दिली.
चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या खात्यातून 22 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात पाठविण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवत, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.
या धमकीमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने पुढील 15 ते 20 दिवसांत चोरट्यांनी सांगितलेल्या विविध खात्यांमध्ये एकूण आठ लाख रुपये जमा केले.
नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
