Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | आकाशाला गवसणी घालणार्या महिला वैमानिकांचा पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिरात सन्मान (Videos)
पुणे : Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | आकाशाला गवसणी घालून तरुणींना प्रेरणा देणार्या महिला वैमानिकांचा पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिरात सन्मान करण्यात आला.
श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा जागर करताना दररोज विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने तरुणींचे प्रेरणास्त्रात बनलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. शुक्रवारी महिला वैमानिक कॅप्टन गौरी बलकवडे, कॅप्टन भाद्रवी गडकरी, कॅप्टन अपूर्वा गिलचे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्सव प्रमुख तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, विश्वकर्मा स्कुलच्या संचालक मधु शितोळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, नवरात्रोत्सवात महिला शक्तीचा जागर केला जात आहे. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला जात आहे. हा उपक्रम हजारो तरुणींना प्रेरणा देणारा आहे. आकाशाची उंची जिच्यापुढे ठेंगणी होते, अशा वैमानिक महिलांचा येथे सन्मान करण्याची संधी मिळाली. या सन्मानाने त्यांच्या जीवनातील रंग अधिक फुलावेत.
कॅप्टन गौरी बलकवडे यांनी सांगितले की, प्रत्येक स्त्री स्वत: सशक्त आहे. आमच्या आईने आम्हाला घडवले, तिने स्वत: घरात राहून आमच्यावर चांगले संस्कार दिले, म्हणून जीवनात आम्ही ही झेप घेऊ शकलो. नारी शक्ती खूप मोठी आहे. सत्य आणि स्वप्न हे वेगवेगळे प्रयत्न करुन लागले, तर ते यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, सत्याच्या खांद्यावर स्वप्ने उभी राहिली तर तुमचे पाय जमिनीवर राहतात आणि हात आकाशाला गवसणी घालतात.
यावेळी आपले प्राण धोक्यात घालून मोठ्या धैर्याने १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी श्री महालक्ष्मीकडे प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वकर्मा स्कुलचे शिक्षक सतिश सहिंद्रे यांनी केले.
