Tiger Shroff Attack News | टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे बिष्णोई टोळीचाच हात, सरकारी वकिलांचा न्यायालयात मोठा खुलासा; आरोपींची संख्या 10 वर
मुंबई : Tiger Shroff Attack News | बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचा दावा सरकारी वकिलांनी बुधवारी न्यायालयात केला. बिष्णोई टोळीचा हस्तक अनिल पंडित याच्या सांगण्यावरूनच टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी देशभरात तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. यामध्ये प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांपासून ते शस्त्रपुरवठा आणि हल्ल्याच्या नियोजनात सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
राजस्थानातून पकडलेल्या तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर फरार झालेल्या फूलसिंग (१८), हृतिक कुमार ऊर्फ रोशन (२२) आणि रेहान अन्सारी (१८) या तिघांना राजस्थानमधील कोटा येथून पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणून बुधवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अमृतसरहून मुंबईपर्यंत शस्त्रपुरवठ्याची साखळी
या हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्त्रे अमृतसरहून आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दिल्लीहून मुंबईत शस्त्रे पोहोचवण्याची जबाबदारी कुणाल आणि सुमित यांच्यावर सोपवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कुणाल, सुमित, राधा वर्मा आणि बबिता राव या चौघांना ताब्यात घेतले. राधा आणि बबिता यांनी रेल्वेने मुंबईत शस्त्रे आणून ती हल्लेखोरांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, या शस्त्रपुरवठा साखळीतील वेगवेगळ्या टप्प्यांवरील संशयित एकमेकांना ओळखत नसल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. अशा प्रकारच्या गुप्त संपर्कपद्धतीला ‘डेड लेटर बॉक्स’ असे म्हटले जाते.
हल्ल्यापूर्वी रेकी केल्याचा संशय; आणखी आरोपी पोलिसांच्या ताब्यात
हरियाणातील सोनीपत येथून अंकित खटक याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय जतीन आणि समीर या संशयितांचीही धरपकड करण्यात आली. काही संशयितांनी हल्ल्यापूर्वी परिसराची रेकी केल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.
मुंबई पोलिसांकडून आरोपींचे मोबाइल संपर्क, आर्थिक व्यवहार, शस्त्रपुरवठा करणाऱ्यांची माहिती आणि हल्ल्याचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चौहान यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. बिष्णोई टोळीशी असलेला कथित संबंध आणि संपूर्ण कटातील प्रत्येक आरोपीची भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
