Kondhwa Pune Crime News | पुणे : कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 पीडित महिलांची सुटका; महिला आरोपीला अटक
पुणे : Kondhwa Pune Crime News | पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील बेकायदेशीर व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. यापूर्वीही पोलिसांनी परिसरातील बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई केली होती.
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय
पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. साळवे गार्डनशेजारील अल्टिमेट बिझनेस सेंटर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खातरजमा केली आणि संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
दोन पीडित महिलांची सुटका; महिला आरोपीला अटक
छाप्यादरम्यान संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. तसेच या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली.
याप्रकरणी २० ऑक्टोबर २०२६ रोजी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३, ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे शहर परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्यासह महेश बेदुगडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, अमित बधे, उमेश पाटील, सुषमा हिंगमिरे, विजय खेंगरे, अनिल बनकर, रुपेश पाटील, प्रवीण उत्तेकर, अरुण किटे, सुजित मदन, भैरू थोरात, सोनाली कांबळे आणि स्नेहा काचरेकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
