Pune Weather News | पुणेकरांना हुडहुडी! शहराचा पारा 11.3 अंशांवर; शिरूरमध्ये 9.3 अंश तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस गारठा कायम  

Pune Weather News | Shivers for Pune residents! The city's temperature drops to 11.3°C; Shirur records 9.3°C, chill to continue for the next two days

पुणे : Pune Weather News | पुण्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असून, शुक्रवारी (२० नोव्हेंबर) शहरात या हंगामातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर शिरूरमध्ये पारा थेट ९.३ अंशांपर्यंत घसरला. वाढत्या थंडीमुळे पहाटे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील सकाळ आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक स्वेटर, जॅकेट आणि कानटोपी घालून घराबाहेर पडताना दिसत आहेत.

शहरात सकाळी दहा वाजेपर्यंत हवेत गारवा जाणवत असून, दिवसभरातील उन्हाची तीव्रताही काहीशी कमी झाली आहे. शुक्रवारी कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

पाषाण, हवेली, एनडीए आणि सिंहगड रस्ता परिसरात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. तर मगरपट्टा आणि चिंचवड भागात तुलनेने तापमान अधिक नोंदवण्यात आले.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये, तर सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमान जळगावमध्ये नोंदवण्यात आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, सकाळचा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, आगामी दिवसांत किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

You may have missed