Pune PMC News | विनानिविदा ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यावरून सत्ताधारी भाजपमध्येच ‘खडाखडी’; नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांचा सभात्याग
पुणे : Pune PMC News | तातडीची गरज म्हणून पूर्वी कारवाई झालेल्या ठेकेदाराला विनानिविदा ५०० ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा प्रस्तावावरून आज सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी पडली. वादग्रस्त ठेकेदाराला निविदा देण्याऐवजी निविदा काढून वॉर्डन नेमावेत अशी मागणी करणाऱ्या भाजप सदस्याची मागणी सभागृह नेत्यांनी फेटाळल्याने सदस्याने निषेध करत सभात्याग केला. तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या सदस्यांनी अतिक्रमणावरून भर सभेत आंदोलन केल्यानंतर आज केलेल्या सभात्यागाने बहुमतात असलेल्या भाजप मध्ये सारे काही अलबेल नाही हे समोर आले आहे.
वाहतूक पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डनची मागणी केली होती. सप्टेंबर मध्ये महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६७ (३) (क) अंतर्गत वॉर्डन नियुक्तीचा तातडीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवला. हे काम जय शंकर असोसिएट या कंपनीला देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले . दरम्यान हा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच वॉर्डन नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ठेकेदार कंपनी ब्लॅक लिस्टेड असताना त्याला हे काम दिल्याच्या तक्रारी आल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सव सुरू असतानाच या प्रस्तावाला स्थगिती दिली.
दरम्यान, नुकतेच या प्रकरणी चौकशी केल्यानंतर आयुक्तांनी पुन्हा स्थगिती उठवली. यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत होता. भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी गणेशोस्तव झाल्याने आता निविदा काढून वॉर्डन नेमण्याची प्रक्रिया सुरू करा अशी मागणी केली. परंतु यावर खुलासा करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने विषय १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आला.
अधिकारी उपस्थित राहिल्यावर सभागृह नेते यांनी हा विषय मंजूर करा असे आदेश दिले. यावर शिळीमकर यांनी संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे. अतिक्रमण विभागाच्या निविदेत या ठेकेदाराला अपात्र करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. दरम्यान यावर कुठलीही चर्चा न करता तो मान्य करण्यात येत असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. यावर शिळीमकर यांनी प्रस्ताव मान्य करण्यास विरोध असल्याची जाहीर नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.
