Pune News | शंकर महाराज समाधी मठावर कोणतीही कारवाई नाही; मठाबाहेरील बेकायदेशीर अन्नछत्र समितीवर एफडीएची कारवाई!
Pune News | सदगुरू शंकर महाराज १९४७ साली जुन्या पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी येथे समाधिस्त झाले. पुढे या समाधीची देखभाल करून पूजा-अर्चा व भंडारा (सामुदायिक अन्नदानाची धार्मिक परंपरा) करण्याच्या उद्देशाने १९६९ साली भक्तांनी श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट (ए-७९३) स्थापन केला. समाधी वर्षापासून आजपर्यंत गेली ७९ वर्षे दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस पालखी व भंडारा करण्याची प्रथा सुरू आहे.
पुढे २००७-०८ च्या दरम्यान ट्रस्टने सभामंडपाच्या बाजूला मालकीच्या मोकळ्या जागेत भव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले. याच वर्षी जागेअभावी समाधी अष्टमीस महाप्रसाद वाटप करणे शक्य नव्हते. काही भक्त व सेवेकऱ्यांनी रस्त्यावर प्रसाद बनवून वाटप करू, असा प्रस्ताव तत्कालीन विश्वस्तांसमोर मांडला. त्यास ट्रस्टने नकार दिला.
परंतु काही निवडक सेवेकऱ्यांनी परवानगी नसतानाही वर्गणी गोळा करून प्रसाद रस्त्यावर बनवून वाटप केला आणि इथेच अनधिकृत अन्नछत्र मंडळाचा जन्म झाला. याच मंडळींनी गरज नसतानाही पुढे अष्टमीस मठाबाहेर प्रसाद करण्याच्या हट्टापायी वादंग सुरू केला. यासाठी समाधी ट्रस्टने न्यायालयात धाव घेऊन अखेर न्यायालयाचा मनाई हुकूम आणला.
समितीने देणग्या गोळा करण्याचा स्टॉल मठापासून दूर नेऊन उपक्रमही मठामागे सुरू केला. परंतु २०१९ साली पुन्हा याच समितीने स्टॉल मठाच्या दारात आणला. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी पुन्हा मनाई हुकूम बजावला आणि पुणे महानगरपालिकेच्या न्यायालयानेसुद्धा स्टॉल हटवण्याचे आदेश दिले. आता पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अंतिम कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
प्रकटदिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाधी मठाच्या स्वयंपाकघराची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नाहीत.
परंतु सदर अन्नछत्र समितीच्या प्रसाद तयार करण्याच्या जागेत एफडीए प्रशासनाला गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने अन्नछत्राच्या कारभारावर मनाई हुकूम बजावत अन्न तयार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सदर मनाई हुकमात मूळ समाधी ट्रस्टच्या नावात आणि अन्नछत्र समितीच्या नावात ‘सदगुरू शंकर महाराज’ या नामसाधर्म्यामुळे आम जनतेत कारवाई समाधी मठावरच झाली, असा गैरसमज पसरला. यात समाधी ट्रस्टच्या दररोज दहा ते बारा हजार भक्तांना व पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद वाटपाच्या उपक्रमाची अवहेलना होऊन समाधी ट्रस्टची विनाकारण मानहानी झाली.
अन्नदान हे अत्यंत पवित्र आणि सेवाभावी कार्य असले, तरी कायद्याच्या दृष्टीने चांगल्या हेतूसाठी केलेले अन्नछत्र समितीचे बेकायदेशीर कृत्य किंवा अतिक्रमण समर्थनीय ठरू शकत नाही. सार्वजनिक शिस्त, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी नियम सर्वांनाच समान लागू असतात.
सरकारी जागेवर परवानगीशिवाय उभारलेल्या स्टॉलमधून भक्तांची दिशाभूल करून देणग्या गोळा केल्यामुळे सर्वसामान्य भक्त, नागरिक आणि रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप करताना अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असते. अधिकृत परवानगीशिवाय चालणाऱ्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नियम पाळले न गेल्यास अनेक धोक्यांची जोखीम घेणे ही बेदरकार वृत्ती आहे.
महाराजांचे धार्मिक किंवा इतर सोपस्कार रस्त्यात करून भक्तांची दिशाभूल करणे तर अक्षम्य आहे.
सामाजिक कार्याच्या नावाखाली जर अशा अनधिकृत कार्याला सूट दिली, तर भविष्यात इतर बेकायदेशीर कामांनाही प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन समाधी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, धनकवडी, पुणे यांच्या विश्वस्त मंडळ
डॉ. मिहिर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री. सतीश कोकाटे (सचिव), श्री. सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, श्री. निलेश मालपाणी आणि श्री. प्रताप भोसले.
