Amol Balwadkar News | पुणे : रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी अमोल बालवडकरांची महापालिका आयुक्तांकडे धाव; बालेवाडी-वाकड जोडरस्ता, म्हाळुंगे टीपी स्कीम मार्गी लावण्याची मागणी

Amol Balwadkar News | Pune: To speed up stalled development works, Amol Balwadkar rushes to the Municipal Commissioner; demands to get the Balewadi-Wakad connector road and Mhalunge TP scheme back on track

उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासह प्रशासकीय अडथळे दूर करण्याची मागणी

पुणे : Amol Balwadkar News | पुणे शहरातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. या भेटीत बालेवाडी-वाकड जोडरस्ता, म्हाळुंगे नगररचना योजना (टीपी स्कीम) यांसह शहरातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बालेवाडी-वाकड जोडरस्त्यासाठी भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याची मागणी

बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी बालवडकर यांनी आयुक्तांकडे केली.

हा जोडरस्ता पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

म्हाळुंगे टीपी स्कीममधील प्रशासकीय अडथळे दूर करा

म्हाळुंगे टीपी स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडथळे दूर करून पुढील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणीही बालवडकर यांनी केली. परिसराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेला गती देण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.

याशिवाय शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

‘पुण्याचा विकास घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे’

पुण्याचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित रस्ते, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या भेटीनंतर बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टीपी स्कीमबाबत महापालिका प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You may have missed