Pune News | पुण्याच्या कारभारात मुलांचा आवाज घुमला! 10 प्रभाग कार्यालयांत पहिल्यांदाच बालसभा; 60 शाळांमधील 700 विद्यार्थ्यांचा सहभाग
खड्डे, कचरा, प्रदूषण, पाणीटंचाई, वाहतूक कोंडीच्या समस्यांवर प्रशासनाचे वेधले लक्ष
पुणे : Pune News | शहरातील नागरी समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये आता लहान मुलांचाही समावेश झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे, कचरा, प्रदूषण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, खेळण्यासाठी मैदानांचा अभाव अशा विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी थेट महापालिका प्रशासनासमोर आपली भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या १० प्रभाग कार्यालयांमध्ये शुक्रवारी पहिल्यांदाच शहरव्यापी बालसभांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६० शाळांतील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुणे क्लायमेट वॉरियर आणि स्फूर्ती फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ‘वॉर्ड वॉच – बेहतर पुण्यासाठी युवा मने’ हा उपक्रम राबविण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बालसभांमध्ये महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. प्रत्येक शाळेतील चार विद्यार्थ्यांच्या पथकाने आपल्या परिसरातील समस्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करून त्या मांडल्या.
शाळेत जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे, अपूर्ण पदपथ, वाहतूक कोंडी, वेगवान वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला निर्माण होणारा धोका, बांधकामांची धूळ, वाहनांचा धूर, नदी-नाल्यांमधील प्रदूषण अशा समस्यांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित मैदाने, स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, नियमित बससेवा आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता करण्याची मागणीही त्यांनी केली.
कचऱ्याचे वर्गीकरण न होणे, उघड्यावर कचरा टाकणे, नाले तुंबणे, पावसाळ्यात पाणी साचणे आणि झाडांची होणारी कत्तल याबाबतही विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली. कोथरूड येथील पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्समधील दृष्टिबाधित विद्यार्थिनींचा सहभाग हे या बालसभांचे विशेष आकर्षण ठरले.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल. तसेच गरजेनुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्याचाही विचार केला जाईल, असे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या संबंधित प्रभाग कार्यालयांकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे.
दरम्यान, माजी महापौर अॅड. वंदना चव्हाण यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. बालसभांच्या माध्यमातून मुलांना शहराच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली असून, प्रशासनालाही मुलांच्या दृष्टिकोनातून शहरातील समस्या समजून घेता आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही बालसभा आयोजित करण्यात येणार आहेत.
