Pune PMC News | पुणे : बांधकाम व्यावसायिकांना महापालिका आयुक्तांचा दणका! केवळ कागदोपत्री रस्ता रुंदीकरण दाखवून FSI, TDR चा लाभ घेता येणार नाही; प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्याशिवाय अतिरिक्त बांधकाम लाभ देण्यास मनाई
पुणे : Pune PMC News | विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या आधारे प्रीमियम एफएसआय (FSI) आणि टीडीआर (TDR) मिळवणाऱ्या बांधकाम प्रस्तावांना आता चाप बसणार आहे. संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष जागेवर संपूर्ण लांबीमध्ये रुंदीकरण झाल्याशिवाय अतिरिक्त बांधकाम लाभ देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. यासंदर्भात २७ नोव्हेंबर रोजी कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पायाभूत सुविधांवरील अतिरिक्त ताण रोखण्यासाठी निर्णय
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१० अन्वये अस्तित्वातील सार्वजनिक रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेने मंजूर केले जातात. मात्र, अनेक ठिकाणी प्रस्तावित रुंदीनुसार रस्ते प्रत्यक्षात विकसित होत नसतानाही यूडीसीपीआर २०२० मधील तरतुदींनुसार प्रीमियम एफएसआय आणि टीडीआरचा लाभ घेऊन बांधकाम प्रस्तावांना मान्यता दिली जाते.
परिणामी, अस्तित्वातील रस्ते आणि महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
नवीन आणि सुधारित बांधकाम प्रस्तावांनाही आदेश लागू
यापुढे कलम २१० अंतर्गत प्रस्तावित रस्त्यांचे संपूर्ण लांबीमध्ये प्रत्यक्ष रुंदीकरण झाल्याशिवाय त्याआधारे अतिरिक्त एफएसआय आणि टीडीआरचा लाभ देता येणार नाही. नवीन, सुधारित तसेच पुढील बांधकाम प्रस्तावांनाही हे आदेश लागू राहणार आहेत.
तातडीने अंमलबजावणीचे निर्देश
शहर अभियंत्यांसह संबंधित विभागांना या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या या निर्णयामुळे कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाच्या आधारे अतिरिक्त बांधकाम लाभ मिळवण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे. तसेच नियोजनबद्ध शहरी विकास आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.
