Baner-Pashan Link Road | बाणेर-पाषाण लिंक रोडचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी; संबंधित जागा मालकांना 68 कोटींचा मोबदला अदा

Baner-Pashan Link Road | Long-pending issue of Baner-Pashan Link Road finally resolved; compensation of ₹68 crore paid to concerned landowners.

पुणे : Baner-Pashan Link Road | बाणेर-पाषाण लिंक रोडच्या प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, या महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा संबंधित जागा मालकांकडून मिळाला आहे. संबंधित जागा मालकांना प्रशासनाच्या वतीने तब्बल ६८ कोटी रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे.

बाणेर-पाषाण परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि परिसरातील नागरी विकास लक्षात घेता बाणेर-पाषाण लिंक रोड हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्यामुळे बाणेर, पाषाण तसेच परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी आणि अधिक सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.

मात्र, शहराच्या मंजूर विकास योजनेनुसार (DP) मौजे पेठ पाषाण (ता. हवेली, जि. पुणे) येथील सर्व्हे क्र. १३४ (पै) ते १३८ व १४० मधून जाणाऱ्या ३६ मीटर रुंद विकास योजना रस्त्याचे (बाणेर-पाषाण लिंक रोड) काम जागेच्या भूसंपादनाअभावी दीर्घकाळापासून रखडले होते. त्यामुळे सदर रस्त्याच्या कामास योग्य गती मिळत नव्हती.

यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिका आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर संबंधित जागा मालकांना मोबदला अदा करून आवश्यक जागेचा ताबा मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

​सदर कायदेशीर व आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम निवाडा (अवॉर्ड) घोषित करण्यात आला. आणि आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकृत ताबा घेण्याची मोहीम राबवण्यात आली. जागेचा ताबा मिळाल्यामुळे बाणेर-पाषाण लिंक रोडच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर बाणेर-पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच बाणेर, पाषाण आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर चालना मिळाल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

You may have missed