Pune News | हजारो भाविकांनी अनुभवली प्रत्यक्षात साकारलेली ‘आदिशक्तीची माया’!
शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्टच्या ‘काली माता; आदिशक्ती’ जिवंत देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : Pune News | शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने टिळक रोड येथे ‘काली माता – आदिशक्ती’ या संकल्पनेवर आधारित भव्य जिवंत देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आदिशक्तीचे सामर्थ्य, महिलांचा सन्मान आणि स्त्रीशक्तीचा जागर यांचा प्रभावी संदेश या देखाव्यातून देण्यात आला.
महिलांना समाजात योग्य मान-सन्मान मिळावा, मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी आणि महिलांच्या सामर्थ्याची जाणीव समाजाला व्हावी, या सामाजिक उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला.
काली मातेच्या रूपातून ‘स्त्री ही अबला नसून आदिशक्तीचे स्वरूप आहे’ हा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. देखाव्यातील आकर्षक वेशभूषा, प्रभावी सादरीकरण आणि प्रकाशयोजनेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून महिला सन्मान, मुलींचे शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि स्त्रीशक्तीचा गौरव या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली. हा देखावा टिळक रोड परिसरातील प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
“आदिशक्तीचा सन्मान म्हणजे प्रत्येक स्त्रीचा सन्मान” हा संदेश देत शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्टने धार्मिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष आबा बागुल, खजिनदार नंदकुमार बांगडे, सेक्रेटरी घनश्याम सावंत, नंदकुमार कोंडाळकर, रमेश भंडारी, आयोजक हेमंत बागुल व अमित बागुल यांच्यासह शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्ट
