Pune Crime News | सासरच्या छळाला कंटाळून चार महिन्यातच नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासु, सासरे यांना काळेपडळ पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | माहेरहून गाडीसाठी ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून आय टी कंपनीत काम करणार्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेपडळ पोलिसांनी पती, सासु, सासरे यांना अटक केली आहे. अवघ्या चार महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता.
वैष्णवी ओंकार घिसरे (वय २३, रा. वडाचीवाडी) असे या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडिल प्रवीण रघुनाथ जरांडे (वय ५१, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर) यांनी काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी पती ओंकार संजय घिसरे Omkar Sanjay Ghisre (वय २८), सासरे संजय महादेव घिसरे Sanjay Mahadev Ghisre (वय ४९), सासु रुपाली संजय घिसरे Rupali Sanjay Ghisre (वय ४२) यांना अटक केली आहे. ही घटना वडाची वाडी येथील वृंदावन सोसायटी येथे २४ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी झाला होता. विवाहावेळी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करुन १० तोळे सोने दिले होते. त्यानंतरही चारचाकीसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली जात होती. विवाहानंतर वैष्णवी काही काळ सासरी राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त ती बंगलुर येथे गेली होती. जूनअखेरीस ती पुन्हा पुण्यात आली होती. त्यानंतर तिने घरुन काम सुरु केले होते. या काळात तिला वारंवार त्रास दिला जात होता , असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे. २४ सप्टेंबर रोजी वैष्णवीने आईला फोन करुन आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड तपास करीत आहेत.
