Crime News | काकांच्या तेराव्याला जाण्याची तयारी सुरू असतानाच इलेक्ट्रिक हिटरचा शॉक लागून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
जयभवानीनगर (छत्रपती संभाजीनगर) : Crime News | काकांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी बुलढाण्याला जाण्याची तयारी सुरू असतानाच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक हिटरचा तीव्र विजेचा धक्का बसल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जयभवानीनगर परिसरात पहाटे सुमारे ५ वाजून ४० मिनिटांनी घडली.
यज्ञा प्रकाश देवरे (वय १४) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे राहणाऱ्या यज्ञाच्या काकांचे निधन झाले होते. त्यांच्या तेराव्याच्या धार्मिक विधीसाठी संपूर्ण कुटुंबाने बुलढाण्याला जाण्याचे नियोजन केले होते.
त्यामुळे सकाळी लवकरच घरातील सर्वजण उठून प्रवासाची तयारी करत होते. आंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता बादलीत इलेक्ट्रिक हिटर लावण्यात आला होता.
मात्र, हिटर आधीपासून सुरू असल्याचे यज्ञाच्या लक्षात आले नाही. तिने थेट बादलीतील पाण्यात हात घालताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला. हिटरमधील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेत यज्ञाचा जागीच मृत्यू झाला.
एकीकडे काकांच्या निधनाचे दुःख असताना दुसरीकडे घरातील अवघ्या १४ वर्षांच्या मुलीचा असा अचानक मृत्यू झाल्याने देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे इलेक्ट्रिक हिटर वापरताना आवश्यक खबरदारी घेण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
