Pune Crime News | पुणे : बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशींना संपवण्यासाठी 2 लाखांची सुपारी! बुके देण्याच्या बहाण्याने गोळीबार अन् सत्तूरने वार; दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करून तसेच धारदार सत्तूरने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १० मिनिटांनी पालखी महामार्गावर बारामती विमानतळ रेल्वे पुलाच्या पुढे पायलट ढाब्यासमोर घडली होती.
बुके देण्याच्या बहाण्याने जवळ आले अन् केला गोळीबार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (रा. जाचकवस्ती, सणसर, ता. इंदापूर) आणि उद्योजक राणा सूर्यवंशी हे संबंधित ठिकाणी उभे होते.
त्यावेळी कटफळच्या दिशेने स्कूटरवरून दोन जण आले. त्यापैकी एकाने फुलांचा बुके देण्याचा बहाणा करत जवळ जाऊन अचानक पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर लोखंडी सत्तूरने वार करून सूर्यवंशी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या हल्ल्यात राणा सूर्यवंशी यांच्या उजव्या दंडावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२), ३(५) तसेच शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींच्या शोधासाठी ६ ते ७ विशेष पथके
या गंभीर घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती उपविभागातील सहा ते सात विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
या तपासात सुमारे १० ते १५ अधिकारी आणि ५० ते ६० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एक विधिसंघर्षग्रस्त बालक आणि त्याचा साथीदार पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, मूळ रा. पिंपरी गवरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा; सध्या रा. कर्वेनगर, पुणे) या दोघांना पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
२ लाखांची सुपारी कोणी दिली? चौकशीत धक्कादायक खुलासा
पोलिसांच्या चौकशीत राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, मूळ रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर; सध्या रा. थोरातनगर, भिगवण) याने दोन लाख रुपये दिल्याचे समोर आले.
ज्ञानदेव शिंदे हा चालक आणि व्यवस्थापनाशी संबंधित काम करत असल्याची माहिती आहे.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे या दोघांना २० ऑक्टोबर रोजी अधिकृतरीत्या अटक केली.
दोन्ही आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यामागील नेमका हेतू काय होता, दोन लाखांची सुपारी देण्यामागे कोणता वाद होता आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
