Pune Crime Court News | दारुच्या नशेत भरधाव वाहन चालविणार्या व असभ्य वर्तन करणार्या गोव्यातील कारचालकाला न्यायालयाने ठोठावला 14 हजार 500 रुपये दंड
पुणे : Pune Crime Court News | दारु पिल्यानंतर पत्नीशी वाद घातल्याने मदतीसाठी तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन मदत मागितली. तेव्हा तू माझी तक्रार पोलिसांना का केली मीच तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो, असे म्हणून दारुच्या नशेत पत्नीला कारमध्ये बसवून कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून बाणेर पोलीस ठाण्यात पोलिसांशी असभ्य वर्तन करणार्या कारचालकाला न्यायालयाने चांगलाच हिसका दाखविला. प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी शिंदे यांनी कारचालकाला १४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अजय पांडुरंग शेतगावकर Ajay Pandurang Shetgaonkar (वय ४१, रा. अल्टो दाबोलीन, दक्षिण गोवा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बालेवाडी येथील चाकणकर मळा येथील हॉटेल आरंभ एक्झोटिया ते बाणेर पोलीस ठाणे या दरम्यान २ मार्च २०२६ रोजी पहाटे चार वाजता घडली होती.
याबाबत पोलीस अंमलदार निलेश बेलदार यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा गोव्यातील राहणारा आहे. निलेश बेलदार व अशोक नंनवरे हे मार्शल ड्युटीवर २ मार्च रोजी होते. पहाटे चार वाजता त्यांना पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल प्राप्त झाला. कॉलरच्या पतीने शिवीगाळ केली असून कॉलरचे पतीचे कुठेतरी एका महिलेसोबत अफेअर आहे. आता तो दारु पित बसला आहे. कॉलरला मारहाण होण्याची शक्यता आहे. मदत पाठवा, असा कॉल प्राप्त झाल्याने बेलदार व अशोक नंनवरे हे दोघेही हॉटेल आरंभ एक्झोटिया येथे गेले. दोघे जण बाहेर होते. कॉलर यांना अजय शेतगावकर हा शिवीगाळ करीत होता. तो मोठ्या प्रमाणावर दारुच्या अंमलाखाली होता. पोलिसांनी मदतीसाठी आलो असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्या पत्नीने अजय शेतगावकर हा दारुच्या नशेत शिवीगाळ करीत आहे. त्याने त्यांना हाताने मारहाण केली आहे, असे सांगितले.
तेव्हा अजय शेतगावकर हा पत्नीला म्हणाला की, तू पोलिसांना का बोलवले, मी पोलिसांना घाबरत नाही. मी स्वत: तुला पोलीस स्टेशनला नेतो, असे म्हणून त्याने पत्नीला कारमध्ये बसविले. दारुच्या अंमलाखाली असताना ही त्याने भरधाव कार चालवत बाणेर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात सुद्धा जोरजोराने ओरडून असभ्यपणाचे वर्तन केले. पोलिसांनी गाडीची कागदपत्रे आहेत का अशी विचारणा केली. तेव्हा त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगून तुम्हा पोलिसांकडून काय होईल ते करुन घ्या, मी तुम्हाला कोण आहे ते उद्या दाखवितो, असे जोरजोराने ओरडून असभ्यपणाचे वर्तन केले.
सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, पोलीस हवालदार अशोक वणवे, पोलीस अंमलदार प्रमिला सहाणे यांनी औंध हॉस्पिटल येथे दारु पिल्याबाबत तपासणी करुन बाणेर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी अजय शेतगावकर याच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम २८१, २९०, २९३, सह मोटार वाहन अधिनियम कलम १८५, १३० (१)(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस अंमलदार संतोष केंद्र यांनी या गुन्ह्याचा तपास करुन एकाच दिवसात दोषारोपत्र तयार करुन न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यामध्ये सरकारी अभियोक्ता शैलजा घोडेस्वार यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार सोनवणे यांनी सहाय्य केले. न्यायालयाने अजय शेतगावकर याला १४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, गणेश रायकर, पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, पोलीस अंमलदार किशन शिंगे, अशोक वणवे, रोहीत पाथरुट, निलेश बेलदार व अशोक नंनवरे, प्रमिला सहाणे यांनी केली आहे.
