Sukhoi Su-30 Crash | आसाममध्ये सुखोई-30 लढाऊ विमानाचा अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्रासह दोन वैमानिक शहीद
नवी दिल्ली : Sukhoi Su-30 Crash | भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाचा आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात अपघात झाला. प्रशिक्षण उड्डाणादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे दोन्ही वैमानिक शहीद झाले. फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील असल्याने राज्यातही हळहळ व्यक्त होत आहे.
हवाई दलाच्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान जोरहाट हवाई दल तळ येथून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क रडारशी तुटल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डोंगराळ भागात विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. दुर्घटनेनंतर हवाई दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि शोध व तपास कार्य सुरू करण्यात आले.
सुखोई-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलातील अत्याधुनिक आणि शक्तिशाली बहुउद्देशीय लढाऊ विमान मानले जाते. हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले तसेच विविध रणनीतिक मोहिमांसाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या दुर्घटनेची गंभीर दखल घेत हवाई दलाने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेल्या दोन्ही वैमानिकांना भारतीय हवाई दलाने श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सुपुत्राने देशसेवेसाठी दिलेल्या बलिदानामुळे स्थानिक पातळीवरही शोक व्यक्त केला जात आहे.
