Pune Crime News | अमेरिकन पुणेकरास फ्रँचायझी देऊन नवा व्यवसाय चालू करुन देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरुन एन बी मार्केट कंपनीच्या मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | अमेरिकेन असलेल्या पुणेकरास एन बी मार्केट कंपनीचे फ्रँचायझी व युक्लीन या कंपनीची पश्चिम भागाची फ्रँचायझी देऊन नवीन व्यवसाय चालू करुन देतो, असे आमिष दाखवून १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन एन बी मार्केट कंपनीच्या मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीकांत उत्तमराव जानोळकर (वय ५८, रा. अशोकनगर, भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन संदिप कोहोळ, गौरव मारिया (फ्रँचायझी इंडिया हेड), शरद, हॅप्पी ट्री कंपनीचे मालक राजीव जालन (रा. मुंबई) युक्नीलचे हेड अरुणभ सिन्हा, संजिवनी या ब्रँडचे एन बी मार्केट कंपनीचे मालक मयांक गर्ग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार जुलै २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अमेरिकेत इंजिनिअर म्हणून नोकरीस होते. त्यांची पत्नी व मुलेही अमेरिकेत राहयला आहेत. २०१७ मध्ये ते पुण्यात आले होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याची इच्छा होती. जुलै २०१७ मध्ये पुण्यात बंडगार्डन येथे फ्रँचायझी इंडिया या कंपनीचे एक्स्पो प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात श्रीकांत जानोळकर हे गेले होते. तेथे त्यांना युक्लीन या कंपनीबाबत माहिती मिळाली. कंपनीच्या लोकांचे कर्मचारी संदिप कोहोळ व शरद यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पंचवटी येथील घरी आले. त्यांना कंपनीची माहिती दिली. त्यानंतर काही दिवसांनी संपर्क करुन कळविले की, तुम्ही एका सेंटरची फ्रँचायझी न घेता पुणे पश्चिम भागाची पूर्ण फ्रँचायझी घ्या. ते तुम्हाला ६ लाख २२ हजार रुपयांमध्ये मिळेल. हॅप्पी ट्री कंपनीची ही युक्लीनची महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युटर आहे. त्यांनी ६ लाख २२ हजार रुपये या कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतले. हॅप्पी ट्री कंपनीचे मालक राजीव जालन (रा. मुंबई) यांच्या मालकीची असल्याचे समजले. युक्लीनचे हेड अरुणभ सिन्हा असल्याचे समजले आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
संदिप कोहोळ, गौरव मारीया (फ्रँचायझी इंडिया हेड) यांनी अशा प्रकारे संजिवनी या ब्रँडचे एन बी मार्केट कंपनीची फ्रँचायझी देतो, असे सांगून त्यासाठी त्यांच्याकडून ११ लाख १४ हजार ५५० रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझीबाबत विचारणा केल्यावर संदिप कोहोळ, गौरव मारिया यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर २०१८ मध्ये ते कामानिमित्त अमेरिकेत गेले. त्यामुळे त्यांचा संपर्क झाला नाही. त्यानंतर कोवीड रोगाची साथ पसरल्याने ते भारतात येऊ शकले नाही. तरीही ते संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, आरोपींनी फ्रँचायझी देण्यास टाळाटाळ केली. त्यांचे घेतलेले पैसे परत न केल्याने त्यांनी फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर तपास करीत आहेत.
महत्त्वाची संपादकीय टीप : सदर बातमी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीतील तपशिलांच्या आधारे देण्यात आली आहे. फिर्यादीमध्ये केलेले आरोप म्हणजे आमचा स्वतंत्र निष्कर्ष किंवा मत नाही. संबंधित आरोपांची सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून निश्चित होईल.
