Pune Crime News | अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे डांबुन ठेवणे, आरोपींची धिंड काढून त्यांना माफी मागायला लावण्याच्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 13 पोलिसांवर 2 गुन्हे दाखल
पुणे : Pune Crime News | आरोपींची धिंड काढून त्यांना मारहाण करणे तसेच खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना डांबुन ठेवून त्यांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवुन धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (PI Mansing Patil), पोलीस उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे (PSI Anna Madhukar Darade), निलेश राजेंद्र मोकाशी (PSI Nilesh Rajendra Mokashi), पोलीस हवालदार सुनिल दादा हनवते (Sunil Dada Hanvate), पोलीस अंमलदार सागर चंद्रकांत बोरगे (Sagar Chandrakant Borge), सोहम कैलास शेंडकर (Soham Kailas Shendkar), राहुल अशोक औंधकर (Rahul Ashok Aundhkar), मितेश दत्तात्रय चोरमोले (Mitesh Dattatray Chormole), रवींद्र शंकर गायकवाड (Ravindra Shankar Gaikwad), संदीप लक्ष्मण आगळे (Sandeep Laxman Agale), पोलीस उपनिरीक्षक फकीर, पोलीस अंमलदार सुतार व पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नावे आहेत. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए कॉलनीतील पार्किंग एरियामध्ये ५ ते ९ जुलै दरम्यान घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दखल घेतली होती. याबाबत आयोगाच्या फॅक्ट फाईडिंग रिपोर्टमधील नोंदविलेली निरीक्षणे व निष्कर्षाच्या आधारे सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत सतिश गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी ५ जुलै रोजी दुपारी शरण आले होते. यातील आरोपीचा आयोगाने नोंदविलेल्या जबाबाप्रमाणे मानसिंग पाटील व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी पट्ट्याने हातावर व पायावर मारहाण केली. त्यांना एसआरए कॉलनीत नेण्यात आले. तेथील घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले. या चित्रिकरणात चारही आरोपींना पोलिसांनी गुडघ्यावर बसवुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडले. आरोपींच्या पायावर पोलिसांकडून काठ्या व लाठ्यांनी मारण्यात आले. आरोपींना सार्वजनिकरित्या अपमानित करुन त्यांना सर्व नागरिकांसमोर गुघड्यावर बसवुन हात जोडून माफी मागण्यास भाग पाडले होते. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आरोपींना आपले घर सोडून त्या भागाबाहेर निघून जाण्याची धमकी दिली़ तसेच पोलीस ठाण्यात त्यांना मारहाण केली़ मात्र याची जनरल डायरी व पोलीस वाहनांचे लॉग बुकमध्ये कोणतीही नोंद केलेली दिसून येत नाही.
चारही आरोपींना मारहाण होऊनही वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये दुखापतीबाबत नोंदी घेतल्याचे दिसून येत नाही. तथापी एका आरोपीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत असल्याचे आढळून येते. आयोगाने नोंदविलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे जबाबामधून या घटनेला पुष्टी मिळते. त्या पोलिसांनी ते स्वत: घटनास्थळी उपस्थित असल्याची कबुली दिली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील असल्याचे ओळखले असून मानसिंग पाटील हे घोषणा करत असल्याबाबत या पोलिसांनी निश्चित केले. या बेकायदेशीर कृत्यांसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे), १२७ (२) गैर परिरोध), १२७ (३) (गैरपरिरोध), १३१ (गंभीर प्रक्षोभ कारण नसताना एरव्ही अमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग), ३५२ (शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ३५१ (२) फौजदारी पात्र धाकदपटशा), १९८ (कोणत्याही व्यक्तीला क्षती पोहचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे) व १९९(लोकसेवकाने कायद्यान्वये दिलेल्या निदेर्शाची अवज्ञा करणे) अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना आंबेगाव पठार पोलीस चौकीमध्ये २० व २१ जुलै २०२६ दरम्यान घडली होती. सीआयडीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते (API Ganesh Mohite), स्नेहल थोरात (API Snehal Thorat), पोलीस उपनिरीक्षक निलेश राजेंद्र मोकाशी, पोलीस हवालदार सुनिल हनवटे, दिनेश टापके, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश पवार आणि सवर्णा दत्तात्रय भिसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फायडिंग रिपोर्ट पार्ट २ मधील नोंदविलेली निरीक्षक व निष्कष याच्या आधारे ही फिर्याद दिली आहे.
२० जुलै रोजी रात्री भारती विद्यापीठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ४ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन आंबेगाव पठार पोलीस चौकी येथे बेकायदेशीरपणे ठेवले. त्यानंतर २१ जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या अहवाल व फिर्यादी गणेश रामदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या ४ अल्पवयीन मुले व इतर ४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बाल कल्याण पोलीस अधिकारी नसताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते यांना तपास देण्यात आला. २१ जुलै रोजी या चार आरोपींना आंबेगाव पठार पोलीस चौकी येथून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणुन बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. तसेच २१ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता तिघा आरोपींना व २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आठवा आरोपी यांना ताब्यात घेऊन बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. त्यानंतर २५ जुलै रोजी या आठ जणांना बाल न्यायमंडळासमोर सादर केले. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी पहिल्या ७ आरोपींना ३ दिवसांपेक्षा अधिक व आठव्या आरोपीला २४ तासांपेक्षा अधिक काळ बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. या दरम्यान, त्यांचा ताबा गणवेशधारी पोलिसांनी अधिकारी व अंमलदार यांच्याकडे असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिसून येत आहे. या आरोपींचा बेकायदेशीर ताबा असताना त्यांना बांबु व बॅटनने मारहाण करण्यात आल्याचे या आरोपींनी आयोगासमोर दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे. तसेच पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीबाबत ससूनचे डॉक्टर अथवा दंडाधिकार्यासमोर माहिती देऊ नये, यासाठी त्यांना धमकण्यात आले.
२० ते २४ जुलैपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते यांनी आरोपींकडे चौकशीनंतर पालकांकडे सुपूर्त केल्याबाबत वेळोवेळी खोट्या नोंदी व खोटे दस्तऐवज तयार करुन बाल न्यायमंडळासमोर सादर करुन न्यायमंडळाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या चार अल्पवयीन मुलांना २० जुलै रोजी रात्री आंबेगाव पठार पोलीस चौकीत बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्यानंतर दुसर्या दिवशी २१ जुलै रोजी पोलीस वाहनाच्या बोनेटला दोरखंडाने बांधुन त्यांची आंबेगाव पठार पोलीस चौकी ते भारती विद्यापीठ अशी सार्वजनिक रस्त्यावरुन बेकायदेशीररित्या व अवमानकारक धिंड (परेड) काढली. या धिंड च्या दरम्यान खुन झालेल्याच्या आईने आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच धिंड दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी आरोपींना बांबु व बॅटनने मारहाण केली. लाऊड स्पिकरद्वारे त्यांना हत्या प्रकरणातील आरोपी/ खुनी आहेत, असे संबोधित करुन त्यांची ओळख उघड केली़ या गैरकृत्यामुळे त्यांची सार्वजनिकपणे बदनामी होऊन त्यांच्यावर हल्ला होण्याचा धोका निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम हे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व आरोपींच्या आयोगासमोरील निवेदनामध्ये स्पष्ट होत आहे.
यावरुन भारती विद्यापीठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोपी १, ३, ७ व ८ हे अनुसुचित जातीचे असल्याची पूर्व कल्पना व पूर्ण जाणीव असतानाही त्यांना जाणिवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याच्या उद्देशाने नागरिकांसमक्ष धिंड काढून, धाकधपटशा दाखवुन, शिवीगाळ व अपमान करुन तसेच मारहाण करुन त्यांचा अवमान व मानहानी केल्याचे निष्पन्न होत आहे. या बेकायदेशीर कृत्यांसाठी ११ पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७४ (बालकांचा तपशील उघड करण्यावर बंदी), ७५ (बालकास क्रुरतेने वागविण्यासाठी शिक्षा),तसेच भारतीय न्यायसंहिता कलम १५५ (२), १२० (कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी दुखापत पोहचविणे), ३३६ (२)(बनावटीकरण), ३३७ (न्यायालयीन अभिलेख किंवा सार्वजनिक नोंद पुस्तक इत्यादीचे बनावटीकरण) व अनुसुचित जाती अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ चे कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास करण्यात येत आहे.
