Pune Crime News | सांभाळण्याासाठी दिलेले श्वान परत करण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन ‘पॉस फॉर लाईफ’ फाऊंडेशनच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत मागितले असता साडेतीन लाख रुपयांची मागणी करुन ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरुन पॉस फॉर लाईफ फाऊंडेशच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिनाक्षी गणेश जगताप (वय ३९, रा. राजेश्वरी निवास, मोझेनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पॉस फॉर लाईफ फाऊंडेशन (Paws for Life Foundation) संस्थेच्या फाऊंडर देवयानी ऊर्फ श्रृती लोणे आणि ट्रस्टी शैला नाईक (रा. म्हातोबाची आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार संस्थेमध्ये आणि फिर्यादी यांच्या घरी १३ जानेवारी २०२६ पासून घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉस फॉर लाईफ फाऊंडेशन ही संस्था रस्त्यावर किंवा कत्तलखान्याकडे जाणार्या सोडलेल्या गायी, म्हशी, कुत्री, मांजरी, पक्षी आणि इतर प्राण्यांना अन्न व निवारा पुरवण्याचे काम करते. त्यांची म्हातोबाची आळंदी येथे संस्था आहे. फिर्यादी यांनी त्यांचे मालकीचे एकूण ७ श्वान तात्पुरत्या स्वरुपात ठेवून घेण्यासाठी संस्थेच्या लोकांशी संपर्क केला होता. तेव्हा संस्थेतील लोक त्यांना मदत करण्यासाठी तयार झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचे ७ श्वान संस्थेतील लोकांकडे सांभाळण्यास दिलेले होते.
फिर्यादी यांनी त्यांचे श्वान परत मागितले. तेव्हा आरोपींनी या श्वानांना अप्रामाणिकपणे बेकायदेशीररित्या स्वत:चे उपयोगासाठी स्वत:ची मालमत्ता म्हणून वापर केला. त्यांचा अपहार केला. फिर्यादी या श्वान परत मागण्यासाठी गेल्या असता त्यांनी ३ लाख ५० हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी यांना ब्लॅकमेल करुन शिवीगाळ व धमकी देऊन मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा लोणी काळभोर पोलिसांकडे दाखल करण्यात आला होता. तेथून तो लोहगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस एम खांडेकर तपास करीत आहेत.
