Pune Crime News | दारुच्या नशेत कुत्र्याला चौथ्या मजल्यावर खाली पत्र्यावर फेकले; कुत्र्याचा पाय, पाठीचा कणा मोडणार्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | दारुच्या नशेत पामेरियन कुत्र्याला मारहाण करणार्या रिक्षाचालकाने थेट चौथ्या मजल्यावरुन खाली पत्र्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कुत्र्याच्या पाठीचा कणा, पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. खडक पोलिसांनी या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश लक्ष्मण परदेशी Ganesh Laxman Pardeshi (वय ५२, रा. राजधानी, प्लाझा, रविवार पेठ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या पद्मिनी पिटर स्टंम्प (वय ६८, रा. भवानी पेठ, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील राजधानी प्लाझा या इमारती ९ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मिशन पॉसिबल फाऊंडेशन या संस्थेच्या संस्थापिका आहेत. या संस्थेमध्ये आजारी व जखमी प्राण्यावर उपचार केले जातात. ९ ऑक्टोंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता यश शेजवळ हा एका जखमी अवस्थेतील कुत्र्याला घेऊन आला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. कुत्र्याला काय झाले असे विचारता त्याने सांगितले की, माझ्या शेजारी राहणारे रिक्षाचालक गणेश लक्ष्मण परदेशी हे या कुत्र्याचे मालक असून त्यांचा पामेरियन कुत्रा डेंनी याला बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पत्र्यावर फेकून जबर जखमी केले आहे.
त्याला अधिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी कुत्र्याचा पाय, पाठीचा मणका मोडल्याचे सांगितले. गणेश परदेशी हा रोज दारु पिऊन त्यांच्या कुत्र्याला हाताने, बेल्टने, तसेच भिंतीवर आपटुन मारहाण करतो. तसेच त्याला बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकल्याचे काही जणांनी पाहिले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. गणेश परदेशी हा पाळीव कुत्र्याला मारहाण करुन क्रुर वागणूक देतो, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ढोणे तपास करीत आहेत.
