Police Constable Suspended In Pune | पुणे : गुटखा विक्रेत्याकडून 1 लाख 65 हजारांची खंडणी घेणारा पोलीस अंंमलदार तडकाफडकी निलंबित
पुणे : Police Constable Suspended In Pune | फुरसुंगी परिसरातील गुटखा विक्रेत्याला कारवाईची भिती दाखवुन १ लाख ६५ हजार रुपयांची खंडणी उकळणार्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस अंमलदार रामकिशन धोंडिबा हंबर्डे (Ramkishan Dhondiba Hambarde) असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. रामकिशन हंबर्डे व सतीश मोरे यांनी संगनमत करुन गुटखा विक्रेत्यास कारवाई करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याचा आरोपावरुन फुरसुंगी पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अवैध गुटखा कारवाईची भीती घालून एक किलो काजू बदामही नेल्याबाबतची तक्रार सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.
फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याबाबत अहवाल पाठविला. ते लक्षात घेऊन पोलीस दलातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या वर्तनाबाबत जनमानसात प्रश्न निर्माण होण्याची तसेच पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी त्याला निलंबित केले आहे.
