Pune Crime News | पुणे : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न आणि जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे ताब्यात; अल्पवयीन मुलाचाही समावेश
पुणे : Pune Crime News | उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न करणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणचे राहणारे असून त्यात एक जण अल्पवयीन मुलगा आहे.
पार्थ वासुदेव अवथळे Partha Vasudeva Avathale (वय १९, रा. पिंपरी, बुलढाणा), ज्ञानदेव महादेव शिंदे Gyandev Mahadev Shinde (वय ४०, रा. करमाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना बारामतीमधील पायलट ढाब्याजवळील पालखी महामार्गावर विमानतळ येथे १८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
राणा दिलीप सूर्यवंशी हे जागेची पाहणी करत होते. त्यावेळी स्कुटीवरुन आलेल्या दोघा मुलांपैकी एकाने राणा यांना बुके दिला. त्यावेळी राणा यांनी पोलीस अंमलदार नितीन यांना फोटो काढायला मोबाईल दिला. मुलाने मास्क लावलेला असल्याने त्यांनी “अरे तू मास्क का लावला आहे, तो काढ” असे बोलत असताना अचानक त्या मुलाने पिस्टल काढून राणा यांच्या दिशेने फायरिंग केले. तेव्हा फट असा आवाज झाला. राणा यांनी मुलाच्या हातावर फटका मारला. तेव्हा त्याच्या हातातून पिस्टल खाली रोडवर पडले. त्याचवेळी या मुलाने सत्तूर काढून त्याने राणा यांच्या उजव्या हाताचे दंडावर लोखंडी सत्तूरने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. सत्तूर खाली टाकून ते पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांच्याबरोबरच्या पोलीस अंमलदार नितीन यांनी पाठलाग करुन एका मुलाला पकडून घेऊन आले. पुढे कॅनव्हायचे गाडीत बसविण्यास घेऊन जात असताना त्या मुलाने नितीनच्या हाताला तोंडाने चावा घेऊन तो बाजूच्या शेतात उडी मारुन पळून गेला.
गंभीर जखमी राणा सूर्यवंशी यांना तातडीने पुण्यात रुबी हॉल मध्ये आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पुण्यासह संपूर्ण राज्य हादरले. बारामती तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासात दोघे जण कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. बारामती पोलिसांनी ही माहिती गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेतील ३ पथकांनी तातडीने त्यांचा शोध सुरु केला. अल्पवयीन मुलासह पार्थ याला कर्वेनगर परिसरात पकडून सोमवारी रात्री बारामती पोलिसांच्या हवाली केले. त्यांचा आणखी एक साथीदार ज्ञानदेव शिंदे याला भिगवण परिसरातून पकडण्यात आले.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस निरीक्षक नारायण पवार अधिक तपास करीत आहेत.
