Pune Crime News | पुणे : भांड्यांच्या व्यवसायातून अंडरवर्ल्ड पर्यंत… आंदेकर टोळीचा चार पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास पुन्हा चर्चेत; वनराज हत्या, आयुष कोमकर खून आणि अक्षय म्हस्के याच्यावरील हल्ल्याने शहर पुन्हा हादरले

Pune Crime News | Pune: From the pottery business to the underworld... The bloody history of four generations of Andekar gang is in the news again; Vanraj murder, Ayush Komkar murder and attack on Akshay Mhaske shook the city again

पुणे : Pune Crime News |  गुन्हेगारी जगतात एकमेकांचा सुड घ्यायचा असेल किंवा विरुद्ध टोळीचे वर्चस्व संपवायचे असले तरी, ते कधीही घरातील लोक मध्ये घेत नाही.  गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या गुंडांच्या नातेवाईकांना हात लावत नाही. जवळपास सर्व गुन्हेगारी टोळ्या हा अलिखीत नियम आतापर्यंत पाळत आले होते. मुंबई, पुण्यासारख्या शहरातील गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या गुंडांच्या नातेवाईकांना त्यामुळे आतापर्यंत भय नव्हते. परंतू, आंदेकर टोळीने सुड घेण्यासाठी आरोपींच्या नातेवाईकांना टारगेट केल्याने सर्व आरोपीच्या नातेवाईकांमध्ये एकच भिती पसरली आहे.

पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि आधुनिक विकासासाठी ओळखले जाणारे शहर असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या काही दशकांत गुन्हेगारीचाही वेगाने विस्तार झाला. या गुन्हेगारी जगतात आंदेकर टोळीचे नाव कायम चर्चेत राहिले. भांड्यांच्या छोट्या व्यवसायातून सुरुवात झालेल्या या कुटुंबाचा प्रवास पुढे दहशत, टोळीयुद्ध, अंडरवर्ल्ड संपर्क आणि राजकीय प्रभावापर्यंत पोहोचल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे.

भांड्यांच्या व्यवसायातून गुन्हेगारीकडे वळलेले पाऊल

१९७० च्या दशकात आंदेकर कुटुंब जुने कपडे घेऊन त्याबदल्यात नवीन भांडी देण्याचा व्यवसाय करत होते. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हा व्यवसाय अनेक कुटुंबांचा उदरनिवार्हाचा आधार होता. मात्र बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर याने स्थानिक गुंडावर हल्ला करून त्याचे बोट तोडल्याच्या घटनेनंतर परिस्थिती बदलली. याच घटनेतून आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

अंडरवर्ल्डशी संपर्क आणि टोळीची वाढ

बाळू आंदेकरने मुंबईतील कुख्यात गुन्हेगारांशी संपर्क वाढवला. हप्तावसुली, स्थानिक वर्चस्व आणि बेकायदेशीर धंद्यातून टोळीची ताकद वाढत गेली. १९७५ च्या सुमारास कसबा पेठेतील अप्पा तारू टोळीशी संघर्ष सुरू झाला. आंदेकर टोळीने शहरात स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक हिंसक घटना घडवल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.

आंदेकर-माळवदकर संघर्षाने बदलला इतिहास

१९८० च्या दशकात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर यांच्यातील अंतर्गत संघर्षाने टोळी युद्धाचे रूप घेतले. १७ जुलै १९८४ रोजी शिवाजीनगर न्यायालय परिसरात बाळू आंदेकर यांची हत्या झाली. त्यातून आंदेकर -माळवदकर यांच्यात टोळी युद्ध सुरु झाले.

पुणे शहरातील आतापर्यंतचे हे भीषण गँगवॉर होते. या गँगवॉरमध्ये ६ गुंड मारले गेले होते. जवळपास १० वर्ष हे गँगवॉर अधूनमधून डोके वर काढत होते.
शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे १९ नोव्हेबर १९९७ रोजी भरपहाटे प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला. या चकमकीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राम जाधव यांच्या दंडाला गोळी चाटून जाऊन ते जखमी झाले होते.

प्रमोद माळवदकर याच्या मृत्युनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. त्यातून माळवदकर – आंदेकर टोळी युद्ध थांबले असले तरी आंदेकर टोळी मात्र वेगाने वाढू लागली होती. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्याकडे आंदेकर टोळीची सुत्रे गेली.

राजकारणात प्रवेश, पण वाद कायम

१९९० नंतर आंदेकर कुटुंबाने राजकारणात प्रवेश केला. कुटुंबातील सदस्य नगरसेवक, महापौर पदापर्यंत पोहोचले. वत्सला आंदेकर यांनी पुण्याच्या महापौरपदाची धुरा सांभाळली, तर पुढील पिढीतील सदस्यांनीही राजकीय क्षेत्रात प्रभाव निर्माण केला. उदयकांत आंदेकर नंतर वनराज आंदेकर नगरसेवक झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली आंदेकर या नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या. विशेष म्हणजे त्या दोघी तुरुंगात असताना निवडून आल्या आहेत. मधल्या काळात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्त्रोतावर लक्ष्य केंद्रीत केले होते. त्यातून बंडू आंदेकर याच्यासह अनेकांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले. तरीही तुरुंगातून या दोघी निवडून आल्या आहेत. यावरुन त्यांचा या परिसरात किती दबदबा आहे, याची जाणीव होऊ शकेल.

वनराज आंदेकर हत्येनंतर संघर्ष अधिक भडकला

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येने पुणे हादरले. पोलिसांच्या तपासात कौटुंबिक वाद, जुने मतभेद आणि टोळीतील संघषार्ची माहिती समोर आली. या हत्येनंतर शहरात सूडाचे राजकारण आणि टोळीयुद्धाची नवीन मालिका सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

आयुष कोमकर खून आणि अक्षय म्हस्केवरील हल्ल्याने पुन्हा तणाव

वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आता उचल खाल्ली आहे. आयुष कोमकरच्या खुनाने हे स्पष्ट झाले. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून खून केला होता. गणेश काळे हा रिक्षाचालक होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती.

पिस्तुल पुरविणार्‍या आरोपीचा भाऊ गणेश काळे याला संपविल्यानंतर त्यातील दुसरा आकाश मस्के याचा रिक्षाचालक भाऊ अक्षय मस्के याला संपविण्याचा प्रयत्न केला.

गुन्हेगारी विश्वातही एक असा नियम आहे की, आपल्या धंद्यात घरच्यांना मध्ये आणायचे नाही. नातेवाईकांना हात लावायचा नाही़ हा उसुल गुन्हेगारी जगतात पाळला जातो. परंतु, आंदेकर टोळीने हा उसुल धुडकावून लावत सुड घेण्यासाठी नातेवाईकांना टार्गेट करण्याचा कट केल्याचे या तीन घटनांवरुन दिसून येते.

You may have missed