Pune Crime News | पुणे महापालिका भरती गैरव्यवहार: डॉ. राजेंद्र खेडेकरला अटक; 5 दिवसांची पोलिस कोठडी
पुणे: Pune Crime News | पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या कथित प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकर याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 3 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Dr Rajendra Khedekar Arrest)
पोलिसांच्या तपासानुसार, या कथित भरती गैरव्यवहारातील आरोपींनी 14 हून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास ₹2.75 कोटींची रक्कम घेतल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबनराव खेडेकर (Dr Rajendra Babanrao Khedekar), पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधीक्षकांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, मे 2022 ते मे 2025 या कालावधीत महापालिका परिसरासह विविध ठिकाणी हा कथित गैरव्यवहार करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.
या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी खेडेकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.
आरोपींनी बेरोजगार उमेदवारांना महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
आरोपींनी संगनमत करून पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रांसह ओळखपत्रे, सेवा पुस्तिका आणि पगाराच्या पावत्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
