Pune Crime News | पुणे : दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घातला; हाणामारीत तिघे जखमी, दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | दांडिया खेळताना चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. चौघांनी मिळून एका १८ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या हाणामारीत अन्य दोघेही जखमी झाले असून, चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी सुनिता शशिकांत ब्रम्हाणे (वय ४२, रा. शिवशक्ती सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आर्यन गौतम गायकवाड Aryan Gautam Gaikwad (वय १९) आणि अनुराज संजय खुडे Anuraj Sanjay Khude (वय १९, दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली आहे.
दांडिया खेळताना धक्का लागला अन् वाद पेटला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील ब्रम्हासन सिटीकडून सैनिकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बेलमॅक सोसायटीच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.
फिर्यादी यांचा मुलगा अनिकेत शशिकांत ब्रम्हाणे (वय १८) हा इतर तरुणांसोबत दांडिया खेळत होता. त्यावेळी त्याचा विकास शिंदे याला चुकून धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघांनी अडवून मारहाण केल्याचा आरोप
तक्रारीनुसार, वादानंतर चार जणांनी अनिकेत आणि त्याचा मित्र तौफिक यांना अडवून शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करत अनिकेतच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले.
या हाणामारीत विकास शिंदे आणि नितीन धोंडे हे दोघेही जखमी झाले आहेत. अनिकेतसह तिन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंदननगर पोलिसांकडून दोघांना अटक
या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी आर्यन गायकवाड आणि अनुराज खुडे या दोघांना अटक केली आहे. घटनेतील इतर आरोपींच्या सहभागाबाबतही तपास करण्यात येत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक समीर अभंग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
