Pune Crime News | निवृत्त एसीपीला चोरट्यांचा हिसका ! विजर्सन मिरवणुकीत 6 जणांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबविले

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | गणेश विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी चोरट्यांनी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांसह ६ जणांच्या गळ्यातील दागिने चोरल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन महिला, वृद्धांच्या गळ्यातील दागिने चोरणार्‍या टोळ्या सक्रीय असतात. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६ जणांच्या तक्रारीवरुन फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

निवृत्त सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण महादेव बोराटे (वय ६२, रा. समर्थ बंगला, बालेवाडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बेलबाग चौकात शुक्रवारी दुपारी सव्वा वाजता विसर्जन मिरवणुक पहात होते. त्यावेळी गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी हातचलाखीने चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तपास करीत आहेत.

अनिल विठ्ठल कुंभारे (वय ६१, रा. माळवाडी, हडपसर) हे बेलबाग चौकातील मुलचंद मीलच्या  दुकानासमोरील फुटपाथवर शुक्रवारी दुपारी १२ वाजता उभे होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपयांची २० ग्रॅमची सोनसाखळी चोरुन नेली.

राहुल भाऊसाहेब पठाडे (वय ३८, रा. भूगाव) हे विसर्जन मिरवणुकीसाठी कुंट चौकात शुक्रवारी सायंकाळी उभे असताना चोरट्यांनी १ लाख रुपयांची १४ ग्रॅमची सोनसाखळी नकळत चोरुन नेली.

सुमीत शिरीष देशपांडे (वय ३४, रा. आंबेगाव) हे कुंटे चौकात असताना सायंकाळी सव्वापाच वाजता त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली.

हार्दिक प्रविण मुंदडा (वय ३०, रा. हिंजवडी) हे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लक्ष्मी रोडवरील गणपती चौकात मिरवणुक पहात होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची २४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरुन नेली.

अभिषेक सुरेश पोटोळे (वय २३, रा. आंबेगाव पठार) हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गुरुजी तालीमजवळ विसर्जन मिरवणुकीचे फोटो काढत असताना एकाचा धक्का लागला. त्यामध्ये बाचाबाची होऊन त्याच्या साथीदाराने पोटोळे यांच्या हातातील मोबाईल हिसकावुन चोरुन नेला.

You may have missed