Pune Ganeshotsav | गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून पुणेकरांना त्रास होणार नाही,असा निर्णय घ्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील
पुणे : Pune Ganeshotsav | पुणे शहरातील गणेशोत्सव हा सर्व पुणेकरांना आपलासा वाटेल, शहराच्या सांस्कृतिक वारशाला साजेसा असेल आणि कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही,अशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे.डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करत पुणेकरांनी घेतलेली भूमिका योग्य असून प्रशासनाने या भावनेचा गांभीर्याने विचार करावा,अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले,पुणे शहराला समृद्ध सांस्कृतिक आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख देशासह जगभरात आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना या परंपरेचा सन्मान राखला गेला पाहिजे. उत्सवातील आनंद, भक्ती आणि उत्साह कायम ठेवतानाच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तसेच मुक्या प्राण्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.मी स्वतः गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असून गेली 40 वर्षे मंडळाच्या कार्यात सहभागी आहे.या प्रदीर्घ काळात असा प्रश्न कधीही निर्माण झाला नव्हता.मात्र गेल्या काही वर्षांतच हा विषय सातत्याने उपस्थित होत आहे.गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखूनच निर्णय झाला पाहिजे.त्याचवेळी सर्वसामान्य पुणेकरांना उत्सवाचा कोणताही त्रास होणार नाही.
याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. या दोन्ही बाजूंचा समतोल साधणारी प्रभावी अंमलबजावणी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे.गणेशोत्सवासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन स्पष्ट आणि व्यावहारिक नियमावली तयार करण्यात यावी,गणेश मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक, पोलीस प्रशासन,महानगरपालिका, ध्वनितज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांशी चर्चा करून सर्वमान्य निर्णय घेणे गरजेचे आहे.नियमांची अंमलबजावणी कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने झाली पाहिजे.गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आलेला असताना या विषयावर वाद निर्माण होणे योग्य नसून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत आधीच स्पष्ट धोरण निश्चित करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे होते.आता तरी तातडीने सर्व संबंधितांची बैठक घेऊन सकारात्मक आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा.
गणेशोत्सव हा राजकीय वादाचा नव्हे, तर श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक अभिमानाचा उत्सव आहे. पुण्याची परंपरा आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपत, नागरिकांच्या आरोग्याचा व भावनांचा विचार करून हा उत्सव शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा व्हावा, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
