Pune News | सारसबाग ते पर्वती रोपवे नको; पर्वती ते तळजाई टेकडी मार्गाचा विचार करा! युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांची मागणी

Pune News | Don’t build a cable car from Sarasbaug to Parvati; consider the route from Parvati to Taljai Hill! Demand by Pune Metropolitan President of Yuva Sena, Hemant Aba Bagul

पुणे : Pune News | पुणे शहरात पर्यटनाला चालना देण्यासाठी रोपवे प्रकल्प उभारण्याच्या संकल्पनेचे स्वागत करतानाच सारसबाग ते पर्वती या प्रस्तावित मार्गाला युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी विरोध दर्शविला आहे. सारसबाग ते पर्वती या मार्गाऐवजी पर्वती ते तळजाई टेकडी हा पर्यायी मार्ग अधिक योग्य ठरू शकतो. त्यामुळे महापालिकेने प्रस्तावित मार्गाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे केली आहे.

पुण्यात रोपवे सुरू करण्याची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मांडली होती, असा उल्लेख बागुल यांनी आपल्या भूमिकेत केला आहे. शहराच्या पर्यटन विकासासाठी रोपवे प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. मात्र, प्रकल्पाचा मार्ग निश्चित करताना नागरिकांची सोय, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि भविष्यातील गरजा विचारात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सारसबाग-पर्वती परिसरात वाहतूक कोंडी वाढण्याची भीती

सारसबाग आणि पर्वती परिसर हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक आणि भाविक येतात. मात्र, सध्या येथे पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने रोपवे प्रकल्पामुळे वाहनांची व पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे बागुल यांनी सांगितले.

विशेषतः स्वारगेट हे पुण्यातील महत्त्वाचे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आहे. मेट्रो, पीएमपी बससेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे या भागात आधीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात रोपवे प्रकल्पाची भर पडल्यास वाहतुकीवरील ताण वाढू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

तसेच बाजीराव रस्ता हा पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने या परिसरातील वाहतूक सुरळीत राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्वती ते तळजाई टेकडी मार्गाचा अभ्यास करण्याची मागणी

सारसबाग ते पर्वती या मार्गाऐवजी पर्वती ते तळजाई टेकडी असा रोपवे उभारण्याचा पर्याय महापालिकेने तपासून पाहावा, अशी सूचना बागुल यांनी केली आहे.

तळजाई टेकडी परिसरातील उपलब्ध जागा, पायाभूत सुविधांची शक्यता आणि रोपवे उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करावा. हा पर्याय व्यवहार्य ठरल्यास शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण न पडता पर्यटकांना रोपवेची सुविधा उपलब्ध करून देता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

सुरक्षा, पार्किंग आणि पर्यावरणीय परिणामांचाही विचार आवश्यक

रोपवे प्रकल्प राबविताना केवळ पर्यटनवाढीचा विचार न करता प्रवाशांची सुरक्षितता, पार्किंगची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध जागा, तांत्रिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे बागुल यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

विकासाला विरोध नाही, पण प्रकल्प पुणेकरांच्या हिताचा हवा

शिवसेनेची भूमिका नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे. शहराच्या हिताच्या चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका नाही. मात्र, विकासकामे करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे.

“रोपवे प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, तो पुणेकरांच्या हिताचा आणि शहराच्या नियोजनाला पूरक असावा. त्यामुळे सारसबाग ते पर्वती या प्रस्तावाचा पुनर्विचार करून पर्वती ते तळजाई टेकडी या पर्यायी मार्गाचा गांभीर्याने अभ्यास करावा,” अशी भूमिका हेमंत आबा बागुल यांनी मांडली आहे.

या संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

You may have missed